दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावरचे व्रण तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का ते आरशात पहा!

24 Jan 2025 15:15:47
 
Ashish Shelar
 
मुंबई : दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावरचे व्रण तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का ते आरशात पहा, असा हल्लाबोल मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
 
उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर केलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "श्रीमान उध्दव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० चा आहे. त्यामुळे १९५१ साली स्थापन झालेल्या जन संघाच्या विषयी त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही. ५ आणि ६ एप्रिल १९८० रोजी दिल्लीत जन संघांच्या नेत्यांची बैठक होऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला त्यावेळी श्रीमान उध्दव ठाकरे यांचे वय २० वर्षे होते त्यामुळे याबाबत त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही."
 
हे वाचलंत का? -  घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही! चित्रा वाघ यांचा इशारा
 
समाजवाद्यांची पुस्तके वाचून जनसंघाचा इतिहास कळणार नाही!
 
"फोटोग्राफी करण्यात दंग असलेल्या आणि करगोट्यातून इज्जत निसट्याच्या वयात असतानाच्या काळातील संदर्भ देऊन बोलणाऱ्या उध्दव ठाकरे यांना आमचे सांगणे आहे की, तुम्ही कुठे जन संघ आणि भाजपाच्या स्थापनेवर बोलता? १०० वर्षे पुर्ण करणाऱ्या संघावर बोलता? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात देशाचा बहुमान उंचावला तसेच भाजपा जगात एक नंबरचा पक्ष ज्यांनी करुन दाखवला त्या अमितभाई शाह यांच्यावर बोलता? समाजवाद्यांची पुस्तके वाचून महाराष्ट्र आणि जनसंघाचा इतिहास तुम्हाला कळणार नाही," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "श्रीमान उद्धव ठाकरे तुम्ही अमितभाई शाह यांच्या पाठीवर वळ उठवणार आहात? कसले? केव्हा? आधी तुम्ही तुमचे वडिल म्हणजे अखंड हिदूंचे आशास्थान वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा २६ जुलैच्या पुरात अडकले होते. तेव्हा तुम्ही मिठी नदीच्या पुराला पाठ दाखवून पंचतारांकित हॉटेलमध्ये पळालात त्या दुर्दैवी घटनेचे वळ तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल आहेत. ते कधीतरी मातोश्रीच्या आरशासमोर उभे राहून पहा. कंत्राटदारांकडून कटकमिशन खाऊन मुंबईचा जो बट्याबोळ केलात त्याचे व्रण दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावर आहेत त्याच्या सुरकुत्या तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का? हे पण आरशाला विचारुन पहा. मग कळेल जखमा खोल आहेत की, तुमच्या मेंदूतच झोल आहे," असा घणाघात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0