'छावा' साठी विकीने घेतली प्रचंड मेहनत, २५ किलो वजन वाढवलं, ६ महिने घोडेस्वारीचं प्रशिक्षण...
23-Jan-2025
Total Views |
मुंबई : (Chhaava Movie Trailer) अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक जीवनपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची मांदियाळी आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी 'छावा' चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.
२५ किलो वजन वाढवलं, ६ महिने घोडेस्वारीचं प्रशिक्षण...
'छावा'मध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी किती मेहनत घेतली, याचा खुलासा त्याने केला आहे. विकी कौशलने सांगितलं की, "छावा चित्रपटातील भूमिकेसाठी मी तब्बल २५ किलो वजन वाढवलं. या चित्रपटात मला घोडेस्वारी करायला सांगतील याची मला कल्पना नव्हती. माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. मी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले. तलवारबाजी, भालायुद्ध आणि घोडेस्वारी शिकण्यासाठी मला सहा ते सात महिन्यांचे प्रशिक्षण मिळाले."
पुढे तो म्हणाला की, "मी उरी : द सर्जिकल स्ट्राइक हा शेवटचा सिनेमा केला जो अॅक्शन सिनेमा होता. त्यानंतर मी अॅक्शन सिनेमा करण्याची संधी शोधत होतो. छावा या चित्रपटाच्या निमित्ताने ही संधी मला मिळाली. मी अनेक महिने ट्रेनिंग आणि अॅक्शन सीक्वेंसची तयारी केली. यासाठी आमचे अॅक्शन कोरिओग्राफर परवेज सर आणि त्यांच्या टीमने आम्हाला साथ दिली. टीझरमध्ये तुम्ही जी अॅक्शन पाहिली त्यासाठी दोन हजार लोक प्रचंड उन्हात शूट करत होते. याशिवाय तब्बल ५०० स्टंटमैन सहभागी होते."