‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम’ चे पुनर्प्रदर्शन, रामभक्तांनी केली चित्रपट पाहायला गर्दी

23 Jan 2025 16:36:02

ramayana
 
मुंबई : (Ramayana: The Legend of Prince Rama)  रामजन्मभूमी अयोध्या येथील राममंदिराच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने 'रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम' या १९९३ साली भारतीय आणि जपानी कलाकारांनी मिळून तयार केलेल्या चित्रपटाचे २२ जानेवारी रोजी मुंबईतील लोअर परळ येथील फिनिक्स मॉल मध्ये पुनर्प्रदर्शन करण्यात आले. प्रेक्षकांचा या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
 
प्रभू श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. फिनिक्स मॉलमध्ये पार पडलेल्या चित्रीकरणादरम्यान रामभक्तांच्या ‘प्रभू श्रीरामचंद्र की जय’ आणि ‘पवनपुत्र हनुमान की जय’ या घोषणांनी चित्रपटगृह दुमदुमून गेले. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
 
वाल्मिकींच्या 'रामायण' महाकाव्यावर आधारित असणारा 'रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम' हा १९९३ साली तयार केलेला एक अॅनिमेशनपट आहे. प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे अॅनिमेशनद्वारे प्रभावी चित्रण यात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन युगो साको, राम मोहन आणि कोइची सासाकी यांनी केली असून चित्रपटाची निर्मिती निप्पॉन रामायण फिल्म कंपनीने केली आहे. चित्रपटाची पटकथा नरेंद्र शर्मा, राणी बुर्रा, राम मोहन, कोइची सासाकी, हिरोशी ओनोगी आणि युगो साको यांनी लिहिली आहे. प्रसिद्ध संगीतकार वनराज भाटिया यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे. चित्रपट हा अॅनिमेटेड असला तरी त्यातील दृश्यांमध्ये प्रभू श्रीराम, सीता माता, श्री हनुमान आणि वानरसेना या सगळ्याचे जिवंत दर्शन घडवलेले आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लहानग्यांसाठी अगदी सोप्या भाषेचा वापर करून प्रभू श्रीरामांचे जीवन सहजतेने मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0