शिंदे गटाची युवासेना करणार राज्यव्यापी दौरा

23 Jan 2025 21:44:44
 
ठाणे : शिवसेनेच्या (शिंदे गट) युवासेनेच्या (Yuva Sena)  बळकटीसाठी तसेच राज्यभर युवासेनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी युवासेनेच्या राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. युवासेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हाप्रमुखांची विशेष बैठक शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना मार्गदर्शक व खा. डॉ. श्रीकांत शिंदे तसेच कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे युवा सैनिकांना मार्गदर्शन केले.
 
राज्यभर युवासेनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. संघटनेची पुनर्बांधणी करण्यासह राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. युवासेनेला अधिक प्रभावी बनविण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रभावी वक्ता तयार करणे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष कृती कार्यक्रम राबविणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
 
युवासेनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना नेतृत्वाच्या संधी मिळवून देणे, त्यांना सक्षम बनविणे, तसेच समाजासाठी भरीव योगदान देण्याचा संकल्प या बैठकीत केला. तसेच राज्यव्यापी दौऱ्यातून युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाला मजबूत करणे हा उद्देश आहे. स्थानिक पातळीवर युवासेनेची बांधणी करून तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. अधिकाधिक युवांना आपल्या कार्यक्रमाद्वारे जोडून घेणे आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0