मुंबई : शेअर बाजाराने तेजीचा सिलसिला गुरुवारीही कायम ठेवला आहे. १०७ अंशांची वाढ होत सेन्सेक्सने ७८ हजारांचा टप्पा ओलांडला. निफ्टीमध्येही ५३ अंशांची वाढ होत २३ हजारांचा टप्पा ओलांडला गेला आहे. माहीती तंत्रज्ञान म्हणजे आयटी कंपन्या तसेच सिमेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. या वाढीला अजून एक कारण म्हणजे अमेरिकेत कृत्रिम बुध्दीमत्ते म्हणजे एआयवर गुंतवणुक वाढीचे वाढण्याची अपेक्षा केली जात आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ५०० बिलियन डॉलर्स इतकी मोठी गुंतवणुक एआय साठी करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भारतातील आयटी कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे. यामुळे आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वधारले. कॉफोर्ज, परसिस्टंट सिस्टीम, झेन्सर टेक्नॉलॉजीज या प्रमुख आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. या आयटी क्षेत्रासोबत सिमेंट क्षेत्रानेही जबरदस्त कामगिरी केली. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या शेअर्सने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत तब्बल सात टक्क्यांची वाढ नोंदवली. याबरोबर केसोराम इंडस्ट्रीज, जेके लक्ष्मी सिमेंट, जेके सिमेंट या सिमेंट उत्पादनातील महत्वाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.
बाजारातील या सर्व कामगिरीबद्दल तज्ज्ञांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार डॉलरच्या तुलनेत रुपयाचे सातत्याने घटणे परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून गुंतवणुक काढून घेण्यास प्रोत्साहीत करत आहे. यामुळेच देशांतर्गत गुंतवणुकदारही नवीन गुंतवणुक करण्याची जोखीम उचलायला तयार नाहीत. भारताचा अर्थसंकल्प आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वांच्याच नजरा या त्याकडे लागल्या आहेत. त्यामुळे शेअर बाजाराचे आस्ते कदम सुरु आहे असे तज्ज्ञ म्हणत आहेत.