इंदू मिल येथील बाबासाहेबांचे स्मारक जागतिक दर्जाचे करा!

23 Jan 2025 18:13:16
 
Sanjay Shirsat
 
मुंबई : दादरमधील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जागतिक दर्जाचे करावे, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या.
 
गुरुवार, २३ जानेवारी रोजी त्यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  शिवाजी पार्क मैदानातील प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणार!
 
संपूर्ण जगासाठी आकर्षण असलेले इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जागतिक दर्जाचे करावे. एप्रिल २०२६ पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्याचा मानस असून स्मारकाचे काम दर्जेदार करावे. तसेच स्मारकासाठी लागणारा निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जात असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. यावेळी स्मारकामध्ये उभारण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा, तीव्र वादळापासून स्मारकाचे संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाय योजना याबद्दल त्यांनी जाणून घेतले.
 
इथल्या इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असून स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. या स्मारकामध्ये शंभर फूट उंच पीठावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूने आच्छादित ३५० फुट उंचीचा पुतळा उभारण्यात करण्यात येणार आहे. या स्मारकाचा संपूर्ण परिसर हरित असेल. तसेच याठिकाणी एक हजार आसन क्षमता असलेले सभागृह, संशोधन केंद्र, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय आणि भूमिगत वाहनतळ राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0