मुंबई : विवेक अग्निहोत्री, ज्यांनी 'द ताश्कंद फाइल्स' आणि 'द काश्मीर फाइल्स' सारखे चित्रपट दिले आहेत, ते सध्या त्यांच्या आगामी 'द दिल्ली फाइल्स' या चित्रपटावर काम करत आहेत. हा चित्रपट बंगालच्या ऐतिहासिक घटनांवर आधारित असून, विशेषतः १९४६ मधील डायरेक्ट ॲक्शन डे आणि नोआखाली दंगलींवर प्रकाश टाकतो.
अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेमागील कारणे शोधण्यासाठी सखोल संशोधन केले आहे. त्यांच्या नुकत्याच केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी १९४६ मध्ये ब्रिटिश भारतात कलकत्ता येथे १६ऑगस्ट रोजी डायरेक्ट ॲक्शन डे झाला, जो मुस्लिम लीगने भारताच्या फाळणीसाठी मुस्लिमांचे वेगळे राष्ट्र (पाकिस्तान) निर्माण करण्याच्या मागणीसाठी आयोजित केला होता. याला ‘ग्रेट कलकत्ता किलिंग’ म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी प्रचंड जातीय हिंसाचार भडकला, ज्यात हजारो लोक मारले गेले.
मुस्लिम लीगने हिंदूबहुल भागांमध्ये पाण्याचे पाइप्स कापून टाकले आणि रेशन दुकाने जाळली, असे विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. हिंसेमुळे हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर विस्थापित झाला आणि अनेक ठिकाणी मानवी हक्कांचे उल्लंघन झाले.
त्याचप्रमाणे, विवेक अग्निहोत्री यांनी १९९० च्या दशकात घडलेल्या काश्मीर हत्याकांड प्रसंगाबद्दल नमूद केले की, काश्मीरमध्ये उग्रवादाचा उदय झाला. यावेळी जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) आणि इतर दहशतवादी संघटनांनी काश्मीरमधील हिंदू समुदाय, म्हणजेच कश्मीरी पंडितांवर भीषण अत्याचार केले.हिंदूंना धमक्या देऊन काश्मीर सोडण्यास भाग पाडले गेले.
विवेक अग्निहोत्री यांच्या पोस्टनुसार, हिंदू कुटुंबांच्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला होता आणि त्यांचे सरकारी रेशन मुस्लिम महिलांनी चोरून नाल्यात फेकले. यामुळे लाखो कश्मीरी पंडितांनी काश्मीर घाटी सोडून इतरत्र स्थलांतर केले.
विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी प्रकल्प ‘द दिल्ली फाइल्स’ संदर्भात ही पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी हिंदू समाजाविरुद्ध झालेल्या ऐतिहासिक अन्यायांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी १९४६ च्या बंगालमधील घटना आणि १९९० च्या काश्मीरमधील नरसंहार यांचा उल्लेख करून हिंदू समुदायावर झालेल्या अत्याचारांबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
विवेक अग्निहोत्री दिगदर्शित 'द दिल्ली फाइल्स' हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दोन भाग असतील, ज्यातील पहिला भाग 'द बंगाल चॅप्टर' नावाने सादर केला जाईल. हा चित्रपट अग्निहोत्रींच्या 'फाइल्स ट्रिलॉजी' मधील तिसरा आणि शेवटचा भाग असेल, ज्यामध्ये त्यांनी भारताच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकला आहे.