सुरक्षा जागृतीची सागर परिक्रमा

22 Jan 2025 11:23:30
Sagari Parikrama

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त ‘सागरी सीमा मंचा’तर्फे वेसावे (वर्सोवा) ते धाकटी डहाणू अशी उत्तरेकडील किनारपट्टीवरील किल्ले, जलदुर्ग व बेटांवर परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. दि. ९ ते दि. १२ जानेवारी या कालावधीत ही परिक्रमा यशस्वीरित्या पार पडली. या परिक्रमेचा मागोवा या लेखात घेतला आहे.

सागरी सीमा मंच’तर्फे समुद्रमार्गे वेसावे ते धाकटी डहाणू सागरी परिक्रमा-२चे आयोजन करण्यात आले होते. वेसावे (वर्सोवा) येथे उद्घाटनाच्या कार्यक्रमात वर्सोवा गावाचे इतिहासकार भानजी काका, रा. स्व. संघाचे बिपिन कुमार,रेखा पागधरे, प्रांत महिला प्रमुख, ‘सागरी सीमा मंच’ तसेच शिवव्याख्याते सुधीर थोरात यांची प्रमुख उपस्थिती राहिली. पहाटे वर्सोवा जेट्टीवरून मढ जेट्टीवर जात मढचा किल्ला व पुरातन किल्लेश्वर (मुक्तेश्वर) मंदिर तसेच हरबादेवी मंदिरात दर्शन घेण्यात आले. मढ येथून पलीकडच्या अंबामाता बेटावर (आता त्याचे नामकरण घुसखोरीमुळे ‘अंबुआ बेट’ असे झाले आहे) जाऊन अंबामाता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले गेले. या एवढ्या छोट्या बेटावर अंबामाता मंदिराशेजारील चर्च तसेच त्यापुढे असलेली भव्य मजार हा विचित्र संयोग जाणवत होता. ओढून-ताणून आपल्या धर्माचे बस्तान येथे बसविण्याचा प्रकार स्पष्टपणे नजरेत भरतो. स्थानिक मंडळी विनोदाने याला ‘अमर-अकबर-अ‍ॅन्थनी’ म्हणतात. अंबामाता बेटानंतर बोटीने आपले प्रयाण वसई किल्ल्याकडे केले. भानुदास जाझम यांची शिडाची बोट याही वर्षी सोबत होती. उत्तन डोंगरीला वळसा घालून पाचूबंदर करत वसई जेट्टीवर उतरताच, कोळी भगिनींनी पारंपरिक कोळी गीतांनी व नृत्याने या सागरी परिक्रमेचे स्वागत केले. वसई किल्ल्यातील नरवीर चिमाजी अप्पांच्या पुतळ्याला वंदन करून जलपान करण्यात आले. त्यादरम्यान अविनाश यांनी वसई किल्ल्याची माहिती दिली. वसईतील हिंदूंवर झालेल्या अत्याचारबाबत फारच कमी माहितीची इतिहासात नोंद झाली आहे, याकडे जाणकारांनी व इतिहासकारांनी लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. कोळीवाडे रिकामे होऊन तेथे मुस्लीम वस्ती निर्माण झाल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली.
पुढे अर्नाळा किल्ल्यापर्यंत जाईपर्यंत संध्याकाळ झाली होती, तरीही अर्नाळाकरांचा दांडगा उत्साह अनुभवता आला. प्रकाशदाता राम नाईक प्रवेशद्वारातून पारंपरिक कोळी वाजंत्री वाजवत परिक्रमेतील साहसी वीरांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी किनारपट्टी सुरक्षेबाबत जनजागृतीबरोबरच, स्थानिक विद्यार्थी, खेळाडू तसेच गावाचे नाव उज्ज्वल करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. शिवव्याख्याते कृष्णा मुरमे यांनी अर्नाळा किल्ल्याचा इतिहास सांगितला. उमेश मिस्त्री विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. दुसर्‍या दिवशी सकाळी अर्नाळा किल्ल्याचे दर्शन केले. गणेश तांडेल यांनी किल्ल्याची माहिती दिली. याप्रसंगी ‘शिवशंभू विचार मंच’तर्फे प्रमोद काटे यांनी शिवकालीन शस्त्रप्रदर्शनी लावली होती. पुढे सातपाटी येथे थोडा आराम करत शिरगावचा किल्ला व महिकावती देवीच्या मंदिराचे दर्शन घेतले. कृष्णाजी धनु यांनी या मंदिराची माहिती दिली. शिरगाव किल्ल्याचा इतिहास त्या परिसरातील किल्ल्याच्या सरदारांचे वंशज पाटील यांनी सांगितला. या किल्ल्यावरील देवमाड किंवा रावणमाड सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

सातपाटी येथे किनारपट्टी सुरक्षेबाबत जनजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर विशेष अतिथी रोहन अभ्यंकर, जिल्हा कार्यवाह पालघर, चंद्रकांत तरे व अंकुश तांडेल हे प्रमुख पाहुणे, केतन अंभिरे प्रांत संयोजक ‘सागरी सीमा मंच’ उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक तसेच आ. गावित यांनीही हजेरी लावली.गुणवंत विद्यार्थी व जीवरक्षकांचा सत्कार करण्यात आला. एक विशेष बाब म्हणून १०५ वर्षांचे मच्छीमार बांधव ज्यांनी पापलेट पकडण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण जाळ्याचा शोध लावलेला आहे. त्यांचाही सत्कार करण्यात आला. शिवव्याख्याते निनाद पाटील यांचे व्याख्यान सर्वांना मंत्रमुग्ध करून गेले. त्यांच्या दहा वर्षांच्या मुलीने अर्नाळा किल्ल्यावरील शिलालेखाचे न बघता केलेले वाचन व त्याचा अर्थ सांगणे, हे भावी पिढीतही त्याचे संस्कार रुजत असल्याचे दाखवून देत होते. अर्नाळा ते सातपाटीदरम्यान तटरक्षक दलाच्या बोटीने आमचा पाठलाग करत आमची चौकशी केली व ड्रोनद्वारे तुमच्यावर नजर ठेवून होतो, असे महिला अधिकार्‍यांनी सांगितले. तेव्हा सीमा सुरक्षेबाबत त्यांची जागृती सर्वांनाच भावली. दुसर्‍या दिवशी सकाळी राम मंदिरात पोहोचून आरती केली व आरती करण्यात आली. तीन वेगवेगळे चमू करून गावात निरीक्षण करत जेट्टीवर पोहोचलो. मुख्य बोटीत सर्वजण आले व धाकटी डहाणूकडे कूच केली. मार्गक्रमण करत असताना भर समुद्रात, बाजूने जाणार्‍या बोटीतील खलाशांकडे, मासे आहेत का, अशी विचारणा केली, तेव्हा थोडी पुढे गेलेली बोट वळवत ते आमच्या बोटीपर्यंत आले. करली माशांनी भरलेली टोपली आमच्याकडे फेकली. कोळ्यांचे औदार्य आणि सहजभाव शब्दातीतच. असो समुद्रात खूप आत गेल्यावर शंखोदराचे देवस्थान आहे. हे फक्त अक्षय तृतीयेला ४० मिनिटांकरिता वर आलेले दिसते, त्याला श्रीफळ अर्पण करण्यात आले. अंभिरे गुरुजी यांनी त्याचे स्थानमहात्म्य सांगितले. आता जे वाढवण बंदर विकसित होणार आहे, त्याचा जवळच हे आहे. पुढे समुद्रात मार्ग दाखविण्यासाठी ‘सागरी सीमा मंचा’च्या कार्यकर्त्यांचीच एक बोट आली. तिच्या पाठीमागे जात आम्ही धाकटी डहाणू जेट्टीवर पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. प्रचंड तुफानामुळे बोटीला पोहोचण्यासाठी उशीर झाला होता. बोट इतकी प्रचंड हेलकावे खात होती आम्हा सर्वांनाच कोळी बांधवांच्या धाडसचे कौतुक करावेसे वाटले. शिववाख्याते आदित्य बोर्डे यांनी आपले व्याख्यान मुद्देसूदपणे व संदर्भासहित मांडले.

समारोपासाठी व्यासपीठावर रा. स्व. संघ कोकण प्रांताचे कार्यवाह, विठ्ठलराव कांबळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत जनजागृती करत किनारपट्टी सुरक्षिततेसाठी सतर्क करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर ‘सागरी सीमा मंच’चे प्रांत संयोजक केतन अंभिरे हे उपस्थित होते. नंदलाल बारी (स्वाध्याय परिवार), अनिल मर्दे (समर्थ बैठक), अजय बारी (नरेंद्र महाराज संप्रदाय) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मैदानातही शस्त्रप्रदर्शनी लावण्यात आली होती. या संपूर्ण प्रवासात ‘सीमा जागरण मंच’चे प्रमुख व अखिल भारतीय संयोजक मुरलीधर भिंडा यांनी दि. ९ ते दि. १२ जानेवारी असा संपूर्ण प्रवास कार्यकर्त्यांसमवेत बोटीतून केला व सर्वांचा उत्साह वाढवला. अनिकेत कोंडाजी, संघटनमंत्री ‘सागरी सीमा मंच’, प्रवीण चौधरी परिक्रमा प्रमुख तसेच मुंबई सागरी सुरक्षा अभ्यासगट सहप्रमुख, सुरेश गुजर परिक्रमा सहप्रमुख तसेच ‘सागरी सीमा मंचा’चे ओशिवरा भाग संयोजक, कार्यक्रम प्रमुख अमित घाटये, ‘आम्ही स्वच्छंदी फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. ‘शिवशंभू विचार मंच’चे कार्यकर्ते शस्त्रप्रदर्शनीसह सहकार्यात अग्रेसर होते. बोटीवरील सत्र व व्यासपीठावरील व्याख्यानात त्यांचा मोलाचा वाटा होता. चंद्रकांत भोगे आणि सहकारी यांच्या बोटीतून जवळजवळ ६० कार्यकर्त्यांनी ही सागरी परिक्रमा-२ यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

केतन अंभीरे
Powered By Sangraha 9.0