मुंबई : आजपर्यंत आम्ही कुठल्याही लाडक्या बहिणींचा लाभ परत घेतलेला नाही, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवार, २२ जानेवारी रोजी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "आजपर्यंत कुठल्याही लाडक्या बहिणींचा लाभ परत घेण्यात आलेला नाही. आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे काही अर्ज येत आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांचे वेगवेगळ्या कारणास्तव स्वत:हून अर्ज येत आहेत. परंतू, त्यांचासुद्धा लाभ शासनाने परत घेतलेला नाही. ज्या लाडक्या बहिणी पात्र नाहीत त्या आम्ही पात्र नसल्याने आमचा लाभ परत घ्यावा, असे स्वइच्छेने अर्ज करत आहेत. पण आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींना लाभ दिला आहे त्यांचा कुठलाही लाभ आम्ही परत घेतलेला नाही. तसेच यासंदर्भात सरकारने असा कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे याबाबत तयार करण्यात येणाऱ्या संभ्रमाला लाडक्या बहिणीने बळी पडू नये," असे आवाहन त्यांनी केले.
हे वाचलंत का? - 'मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्पातून मराठवाड्याला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध होणार!
त्या पुढे म्हणाल्या की, "शासनाच्या कुठल्याही योजनेची दरवर्षी फेरतपासणी होतच असते. ही नियमित प्रक्रिया आहे. यात काहीच नवीन नाही. फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नवीन असल्याने त्यासंदर्भात संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. आम्ही आतापर्यंत एकाही महिलेचा लाभ परत घेतलेला नाही. ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत लाभ घेतला आणि त्यांना आता माहिती झाले की, आपण पात्र नाहीत अशा महिलांनी स्वत:हून अर्ज केलेले आहे. आम्ही त्यांच्याकडे संपर्क करुन माहिती मागवलेली नाही."
पालकमंत्रीपदाबाबत आमचे तिन्ही नेते योग्य तो निर्णय घेतील!
पालकमंत्रीपदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, “अशा पद्धतीचे वक्तव्य करणे माझ्यासाठीसुद्धा आश्चर्यजनक आहेत. मी आज ज्या मताधिक्याने निवडून आली आहे त्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवली आहे. आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी काम केले आहे. एकमेकांसाठी कामच केले नसते तर इतके मताधिक्य मिळाले नसते. महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही सगळ्या घटक पक्षांनी एकजूटीने काम केले आहे. त्यामुळे आता त्याचे मुल्यमापण करणे योग्य नाही. ५ वर्षांनंतर निवडणूका आल्यानंतर त्याचे मूल्यमापन होईल. आता आम्ही सगळे निवडून आलो असून पुढची ५ वर्षे आम्हाला एकत्रित काम करायचे आहे. त्यामुळे कुरघोड्या, मूल्यमापन आणि इतर खटाटोप करण्यापेक्षा पुढच्या पाच वर्षात राज्याला पुढे न्यायचे आहे. त्यामुळे या विषयांना महत्व दिल्यास ते योग्य राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज्यात नाहीत. ते दावोसमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असताना कुठल्याही गोष्टीवरून इथे वातावरण दुषित करणे योग्य नाही. पालकमंत्रीपदाबाबत आमचे तिन्ही नेते योग्य तो निर्णय घेतील," असे त्या म्हणाल्या.