बीड हत्या प्रकरणातील सर्व आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

21 Jan 2025 15:05:00
 
BEED
 
बीड : (Beed Case)  बीडमधील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्या दिवशी वादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. सीसीटीव्ही व्हिडिओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि बालाजी तांदळे एकत्र असल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर आरोपी कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, विष्णू चाटेदेखील यात दिसले आहेत.
 
२९ नोव्हेंबर २०२४ चे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितले जात आहे. त्यासंबंधीचा व्हिडिओ उघडकीस आला आहे. या व्हिडिओत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटीलही यात आढळून आले आहेत. हा सीसीटीव्ही व्हिडिओच्या रुपाने या प्रकरणातील खूप महत्त्वाचा डिजिटल पुरावा मिळाल्याचे बोलले जाते.
 
विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरील हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0