राखेतून जन्म घेण्याची प्रेरणा

20 Jan 2025 10:07:47
Los Angeles

काही दिवसांपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमूळे, संपूर्ण जग हादरून गेले. लॉस एंजेलिस हे शहर अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियातील सगळ्यात मोठे शहर आहे. ‘जागतिक मनोरंजनाची राजधानी’ म्हणून हे शहर ओळखले जाते. लॉस एंजेलिस हे शहर तिथली संस्कृती, इतिहास आणि निसर्गसंपदेसाठी प्रसिद्ध आहे. ‘हॉलिवूड चित्रपटसृष्टी’, ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’ हा जगप्रसिद्ध रस्ता, प्रसिद्ध ‘युनिव्हर्सल स्टुडिओ हॉलिवूड’, जगभरातील कलाकार जिथे आपली कला सादर करतात, तो ‘वॉल्ट डिस्ने कॉन्सर्ट हॉल’,प्रसिद्ध ‘ग्रिफिथ ऑब्जवेटरी इमारत’, अनेक जगप्रसिद्ध कलाकारांच्या कलाकृती जिथे आहेत, ते ‘गेटी संग्रहालय’, ‘ला ब्रे टार पिट्स’ हे ऐतिहासिक संग्रहालय, दुसर्‍या महायुद्धातील युद्धनौकांचे, ‘युद्धपोत यूएसएस आयोवा संग्रहालय’ अशा कला, साहित्य आणि संस्कृतीशी संबंधित अनेक वास्तू लॉस एंजेलिसमध्ये आहेत. त्यामुळे या शहराला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे.

लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे कलाक्षेत्राला खूप मोठा फटका बसला आहे. या आगीत असंख्य कलाकार, कलासंग्राहक आणि कला व्यावसायिकांना त्यांची घरे सोडून, दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले. अनेक कलाकारांच्या घरात असलेल्या त्यांच्या कलाकृतीही जळून राख झाल्या. अनेकांना आपली कामाची ठिकाणेही गमावावी लागली. “या आगीत कलाक्षेत्राचे झालेले नुकसान खूप व्यापक आहे,” अशी माहिती अमेरिकेतील अनेक कलासंरक्षक संस्था आणि विमा कंपन्यानी, माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. अमेरिकेतील एका विमा विशेषज्ञ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सायमन डी. बर्ग कॉड्रिंग्टन यांनी “या आगीत कलाक्षेत्राचे झालेले नुकसान, हे अमेरिकेतील आजवर झालेले सर्वात जास्त मोठ्या कला नुकसानांपैकी एक असणार आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. या आगीचा फटका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यालाही बसला असून, आगीमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. सुदैवाने काही कलाकारांना, कलाकृतींना आणि संग्रहालयातील महत्त्वाच्या गोष्टींना योग्यवेळी सुरक्षित ठिकाणी हलवल्यामुळे ,
त्यांचे नुकसान टळले. तरीही झालेली हानी विनाशकारीच होती. जगभरातील कलाप्रेमींनी याविषयी हळहळ व्यक्त केली.

कलाकारांच्या नशिबी संघर्ष हा जणू लिहिलेलाच असतो. जगण्याची राख झाल्यावरही, त्या राखेतून पुन्हा जन्म घेण्याची फिनिक्स पक्ष्यासारखी कला कलाकारालाही अवगत असते. त्यामुळे संकट कितीही मोठे असले, तरीही कला किंवा कलाकार त्यात संपत नाही. पुन्हा जोमाने ते नवीन सुरुवात करतातच. लॉस एंजेलिसमधील कलाकारांनीही, अशीच नवीन सुरुवात केली आहे. शुक्रवार, १७ जानेवारी रोजी, ‘गॅलरी असोसिएशन ऑफ लॉस एंजेलिस’ म्हणजेच ‘गाला’ या नावाने प्रसिद्ध असणार्‍या संस्थेने, आगीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आणि पुन्हा जोमाने सुरुवात करण्यासाठी, कलाकारांना आवाहन करणारे एक पत्र प्रसिद्ध केले. “गाला’ ही २०२० मध्ये स्थापन झालेली, लॉस एंजेलिसमधील १०० संग्रहालयांची एक संघटना आहे. संकटाच्या प्रसंगी आणि एकमेकांशी घट्टपणे जोडलेला समूह म्हणून कलाविश्वाची एक ओळख स्पष्ट झाली असून, जगभरातील कलाप्रेमींनी काळजी आणि पाठिंबा दर्शविल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. येत्या आठवड्यांमध्ये कलाक्षेत्राशी संबंधित लोक, पुन्हा कामावर रुजू होतील. त्यांपैकी काही रुजू झालेसुद्धा आहेत,” असे ‘गाला’च्या पत्रात म्हटले आहे. सोबतच आगीमुळे ठप्प झालेल्या लॉस एंजेलिसमधील इतरही गोष्टीह लवकरच सुरू होणार असल्याचेही, जाहीर करण्यात आले आहे. हॉलिवूड कलाकारसुद्धा पुन्हा नव्याने आपल्या कामाला सुरुवात करणार आहेत.

लॉस एंजेलिसमध्ये घडून आलेला अग्नितांडव भीषण होताच. त्यात झालेले नुकसान भरून निघणारे नाहीच. पण त्या नुकसानानंतरही तिथल्या कलाकारांनी जिद्दीने केलेली नवी सुरुवात, ही प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे. आयुष्यात राख होण्याचे प्रसंग अनेकदा येणारच, पण त्या राखेतूनही नवा जन्म घेण्याचा संदेश या घटनेने जगाला दिला आहे.

दिपाली कानसे
Powered By Sangraha 9.0