
वॉशिंग्टन डीसी : अमेरीकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प काही तासांमध्येच राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. अशातच आता कॅपिटल वन एरिना येथील ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA)च्या एका सभेत बोलताना ट्रम्प म्हणाले की अमेरीकेतल्या नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यावर भर देणार आहे. अमेरीकेचे ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्यापूर्वी त्यांनी अमेरीकेतील नागरिकांना संबोधित केले.
अशातच डॉनाल्ड ट्रम्प म्हणाले की उद्याचा सूर्यास्त होण्यापूर्वी अमेरीकेवरील आक्रमण संपुष्टात येईल. अमेरीकेच्या सीमेवर होत असलेले हल्ले रोखणार असल्याची सुद्धा त्यांनी नागरिकांना ग्वाही दिली. बायडेन यांच्या कारकिर्दीत घेतलेले अनेक निर्णय ट्रम्प मागे घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून अमेरीकेत राहणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात येणार आहे. आपल्या हजारो कार्यकर्त्यांसमोर बोलताना ट्रम्प म्हणाले की आपण आपल्या मालमत्तेवर पुन्हा दावा करणार आहोत. आपल्या देशाच्या सीमांवर आपण पुन्हा एकदा नियंत्रण मिळवणार आहोत. त्याच बरोबर ट्रम्प म्हणाले की अमेरीकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अवैध स्थलांतरितांना हद्दपार करणारी मोहीम आपण हाती घेणार आहोत. परंतु ही प्रक्रिया सोप्पी नसेल. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होणार असून, यामध्ये अनेक वर्ष लागू शकतात.
'..तर युद्ध झालाचं नसतं'
गाझामधील इस्रायल आणि हमासमधील संघर्षाला आता अखेर पूर्णविराम मिळणार असल्याची चिन्हं आहेत. यावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की मी जर का अमेरीकेचा अध्यक्ष असतो तर हे युद्ध झालंच नसतं. आमच्या प्रशासनाने माझी निवडणूक झाल्याच्या तीन महिन्यांपेक्षा कमी कलावधीत हे सगळं साध्य केलं. जे बायडेन यांना ५ वर्षात करता आलं नाही, ते आम्ही ३ महिन्यांच्या कालावधीत साध्य केलं आहे.