आपले पाल्य एखाद्या क्षेत्रात प्रगती करत असेल तर, सर्वसाधारणपणे पालक त्याची शक्ती होऊन त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहतात, अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील. मात्र, काही कमनशिबी खेळाडू असेही जगात आहेत, ज्यांच्या पालकांनीच त्यांना न खेळण्यासाठी प्रचंड त्रास दिला. अशाच एका देदीप्यमान कारकीर्द लाभलेल्या मुर्झिनी खेळाडूविषयी....
आरित कपिल, वय वर्षे नऊ याने बुद्धिबळ स्पर्धेत इतिहास रचल्याची वार्ता अनेकांनी, दि. १० डिसेंबर २०२४ रोजी वाचली असेल. त्या आरितच्या वार्तेपाठोपाठभारताचा डोम्माराजू गुकेश बुद्धिबळात जगज्जेता झाल्याची वार्ता, दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी आपला आनंद द्विगुणित करून गेली. गुकेश हा इतिहासातील तिसरा सर्वात लहान ग्रँडमास्टर आहे, ज्याला ‘फिडे’ने मार्च २०१९ मध्ये ग्रँडमास्टर पद दिले होते. नऊ वर्षे, दोन महिने व अठरा दिवसांच्या असलेल्या नवी दिल्लीच्या आरित कपिल याने, ग्रँडमास्टर खेळाडूला पराभूत केले आहे. ’क्लासिकल टाईम’ प्रकारामध्ये ग्रँडमास्टरला पराभूत करणारा तो भारताचा सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला असून, जागतिक स्तरावरील सर्वांत तिसरा लहान बुद्धिबळपटूही ठरला आहे. आरित काही दिवसांनी पुण्यात होणार्या नऊ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेतआपली चमक दाखवणार आहे, अशी बातमी आहे.
या छोट्यांच्या जागतिक स्तरावरच्या यादीत नऊ वर्षांचा रोमन शोग्दझिव्ह हा ’इंटरनॅशनल मास्टर’ अशी पदवी (आय. एम. नॉर्म) मिळवणारा, आतापर्यंतचा सर्वात तरुण ठरला असल्याची बातमी दि. ११ जानेवारी रोजी वाचायला मिळाली.
रोमन शोग्दझिव्ह याने केवळ नऊ वर्षांचा असताना आधी एफ. एम. अर्थात फिडे मास्टर पदवी घेऊन, नंतर आंतरराष्ट्रीय मास्टर अर्थात आय. एम. नॉर्म या पदवीसाठी अर्ज केला. ती पदवी मिळवणारा इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू बनण्याचा विक्रम, रोमन शोग्दझिव्हने केला. वयाच्या दहा वर्षांपूर्वी २ हजार, ३००चा आकडा पार करणार्या, तीन खेळाडूंपैकी तो एक ठरला आहे.
शोग्दझिव्हने अनेक कठीण डाव रचून त्यात यश मिळवले आहे, जसे की, ६१ चाली चालींमध्ये डाव बरोबरीत रोखणे, ८४ चालींमध्ये मात करणे वगैरे. या रशियन तरुणाने नऊ वर्षे, दहा महिने आणि सात दिवसांत पहिला आय. एम. नॉर्म पटकावला. त्याच्या तुलनेत, ग्रँडमास्टर अभिमन्यू मिश्रा आजवरचा जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला होता. जेव्हा तो दहा वर्षे नऊ महिन्यांचा होता, तेव्हा त्याने जवळजवळ एक वर्ष आधी त्याचा पहिला आय. एम. नॉर्म पटकावला होता.
त्याच्या नॉर्मच्या फक्त तीन आठवड्यांपूर्वी, शोग्दझिव्ह दहा वर्षांखालील गटाचा चॅम्पियन बनला. त्याने २०२३ मध्ये आठ वर्षांखालील जागतिक युवा चॅम्पियनशिप आणि २०२२ मध्ये आठ वर्षांखालील युरोपियन युथ चॅम्पियनशिप जिंकली होती.
एका मुलाखतीत शोग्दझिव्ह सांगतो, यावर्षीच्या माझ्या निकालावर मी आनंदी आहे. मी अनेक प्रकारे चांगली कामगिरी केली आणि चांगला खेळ केला. पुढच्या वर्षी मी आंतरराष्ट्रीय मास्टरचे विजेतेपद मिळवण्याचे ध्येय निश्चित केले आहे, असे रोमन शोग्दझिव्ह पुढे सांगत होता. त्याचे पालक सांगतात की, रोमनच्या या कामगिरीमुळे त्याच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. रोमनकडे बुद्धिबळातील एक उगवता तारा म्हणून पाहिले जाईल आणि आता त्याला मोठ्या अपेक्षांसाठी जगावे लागेल. त्याचवेळी, मिळणार्या यशात त्याचा क्षमतांवरचा विश्वास देखील महत्वाचा आहे. रोमनला नक्कीच वाटते की, तो खूप सक्षम आहे आणि हे त्याला अतिरिक्त प्रेरणा देईल.
शोग्दझिव्हची प्रतिभा विशेषतः स्पीड चेसमध्ये दिसून येते, ज्याचा पुरावा त्याच्या २०१८ च्या ‘फिडे’ ब्लिट्झ रेटिंगने दर्शविला आहे. तो नियमितपणे ग्रँडमास्टर परफॉर्मन्स देतो. जसे की, अलीकडील ब्लिट्झ स्पर्धेत त्याने आंद्रे एसिपेन्को, व्लादिमिर पोटकिन, एर्नेस्टोडी अल्केरेव्ह आणि एर्नेस्टोडी अल्सेकीव्ह यांसारख्या बलाढ्य ग्रँड मास्टर्सना पराभूत केले.
२०२३च्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये रोमनने, पाच ग्रँडमास्टर्सना हरवून दाखवले होते. तेव्हा तो फक्त आठ वर्षांचा होता. जी. एम. मॅग्नस कार्लसनच्या भुवयाही या पराक्रमाने उंचावल्या होत्या, रोमन यांचे हे यश पाहणे खूप मजेदार आहे. कदाचित काही वर्षांत आम्ही त्याला अगदी शीर्षस्थानी पाहू असे कार्लसन याने एका वृत्तवाहिनीला देखील सांगितले.
२०२१ मध्ये जेव्हा तो अवघ्या सहा वर्षांचा होता, तेव्हा त्याने तीन दशलक्ष व्ह्यूज असलेल्या एका व्हायरल युट्यूब व्हिडिओमध्ये आपले कौशल्य दाखवले होते. शोग्दझिव्हचा उदय हा बुद्धिबळ खेळणार्या तरुण खेळाडूंच्या नवीन पिढीचे प्रतीक ठरला आहे.
एलिस्टा काल्मिकिया येथे जन्मलेला शोग्दझिव्ह आता मॉस्कोजवळ आपल्या कुटुंबासह राहतो. त्याने अलीकडेच एका लॉ फर्मसोबत प्रायोजक करार केला आहे. या बाल आणि युवा बुद्धिबळपटूंच्या कहाण्या ऐकताना, आजून एका मुलाची गोष्ट ऐकण्यासारखी आहे. त्याच्या घरगुती जीवनात त्याला, त्याच्या बहिणींना तसेच त्याच्या आईला, त्याच्या वडिलांनीच कसे आपले जीवन नकोसे करून सोडले होते. हे वाचले, तर आपण थक्क होतो. एवढेच नव्हे, तर त्याने त्याच्या वडिलांच्या दुष्ट कृत्यांवर मात करून, आपले कुटुंब बुद्धिचातुर्याने सावरले आणि स्वतः बुद्धिबळात नाव कमावत जगप्रसिद्ध झाला.
ग्रँडमास्टर व्होलोदार मुर्झिन याने, नव्याने विश्व रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनचा ताज मिळवला आहे. त्याने आपल्या कुटुंंबाला अपमानास्पद वागणूक देणार्या स्वतःच्यावडिलांच्या हिंसक पकडीतून, तो आणि त्याचे कुटुंब कसे सुटले, याची त्रासदायक कहाणी सांगितली.
१८ वर्षीय हा ग्रँडमास्टर, इतिहासातील दुसरा सर्वात तरुण वेगवान जागतिक चॅम्पियन बनला आहे. त्याने न्यूयॉर्कमधील २०२४ वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप मिळवताना, अलेक्झांडर ग्रिस्चुक आणि इयान नेपोम्नियाच्ची या आपल्याच देशबांधवांपेक्षा जास्त गुण पटकावले. त्याने जलद विजेतेपदासाठी ९० हजार डॉलर्स आणि ब्लिट्झमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी २० हजार डॉलर्स रोख मिळवले होते.
त्याच्या उल्लेखनीय पराक्रमाच्या मागे, एक धक्कादायक कथाही आहे. रशियन स्पोर्ट्स वेबसाईट चॅम्पियन्सला दिलेल्या भावनिक मुलाखतीत,या १८ वर्षीय मुलाने पहिल्यांदाच त्याच्या बालपणीच्या आघातांबद्दल खुलासा केला आहे.
मारहाण करणे हा त्याच्या वडिलांचा जणू नियमच ठरला होता. मुर्झिनने सांगितले की, त्याची आई एकटेरिना त्याला आणि त्याच्या चार बहिणींना, त्याच्या वडिलांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी त्यांच्या मूळ गावी म्हणजे, निझनी टॅगिलपासून १ हजार, १०० मैल दूर घेऊन गेली. मी सात वर्षांचा असताना, मला माझ्या वडीलांनी सतत मारहाण करायला सुरुवात केली असल्याचे मुर्झिन सांगतो. जेव्हा आई आणि माझी मधली बहीण वडिलांना भेटायला आली, तेव्हा वडिलांनी मुर्झिनच्या मोठ्या बहिणीला फावड्याने मारले असल्याचे मुर्झिन म्हणाला. वडीलांसोबतचे नाते कधी सामान्य असल्याचे मुर्झिनला आठवत नाही. घरातील प्रत्येकावर हल्ला करणे, हे मुर्झिनच्या वडीलांसाठी नेहमीचेच होते.
जेव्हा मुर्झिनचे कुटुंब राजधानीला पळून गेले, तेव्हा व्होलोदार ११ वर्षांचा होता. तोपर्यंत, त्याने नुकतेच ‘युरोपियन युथ अंडर १२ चॅम्पियनशिप’ जिंकली होती आणि त्याच्या आईने त्याला पळून जाण्याची संधी मिळवून दिली. त्यानंतर व्होलोदारला एका बुद्धिबळ क्लबकडून, तरुण आशादायी खेळाडूंसाठीची ऑफरही मिळाली होती.
हा ग्रँडमास्टर सांगतो की, त्याचे कुटुंब बेडशिवाय रिकाम्या अपार्टमेंटमध्ये कसे गेले आणि त्यांना जमिनीवर झोपावे लागणार नाही, म्हणून त्यांनी गाद्या विकत घेतल्या. हा काळ खूपच कठीण होता. कधीकधी आमच्याकडे खायलाही काही नव्हते असे व्होलोदार मुर्झिन सांगतो.
मुर्झिनच्या अडचणी तिथेच संपल्या नाहीत. तो म्हणतो, त्याच्या वडिलांनी त्याच्यावर प्रवास बंदी घालून त्याच्या जीवनावर नियंत्रण ठेवणे चालू ठेवले, जेव्हा तो त्याचा अंतिम ग्रँडमास्टर पटकवण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी बंदी उठवण्यासाठी त्यांना न्यायालयात जावे लागले. मुर्झिनने २०२२ मध्ये त्याचे ग्रँडमास्टर शीर्षक मिळवले.
मुर्झिनच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांची बुद्धिबळाबाबत एक टोकाची भूमिका होती. मुर्झिनचे वडील बुद्धिबळ हा ’सैतानाचा खेळ’ आहे, असे समजत असत. मुर्झिनचे वडील त्याला दमून जाईपर्यंत खेळायला लावत असत.अनेकदा पहाटे ४ वाजेपर्यंत जागे ठेवत असत. त्यावेळी मुर्झिनचे डोळे गपागप मिटायचे, तो खेळासाठी लागणारा विचारही करू शकत नसे असे मुर्झिन सांगतो. अनेकदा तर वडीला मला शाळेतही जाऊ देत नसत असेही व्होलोदार मुर्झिन म्हणतो. मुर्झिनचे वडील तुम्ही तुमचे केस फक्त कच्च्या अंड्यानेच धुवा, असा आग्रह धरत असत. अनेकदा ते अंडी घेऊन मुर्झिनच्या डोक्यावर आणि त्याझ्या बहिणींच्या डोक्यावर फोडायचे. मुर्झिनने आक्षेप घेतला, तर ते त्याचे डोके भिंतीवर आपटायचे.
सहाजणांचे व्होलोदार मुर्झिनचे हे कुटुंब आता मॉस्कोच्या बाहेर असलेल्या, खिमकी या गावी ५० चौ. मीटरच्या दोन बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये राहते. व्होलोदारने त्याच्या वडिलांशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत. ती आता नक्कीच भूतकाळातील गोष्ट ठरली आहे. मुर्झिनला खात्री आहे की, त्याच्या सर्व कुटुंबासाठी, जे घडले ते सर्व क्षमा करणे आणि विसरणे कठीण आहे.
जागतिक क्रमवारीत ३१व्या क्रमांकावर असलेल्या ग्रँडमास्टर आंद्रे एसिपेन्को यांच्यासोबत, मुर्झिन हे रशियाच्या काही आशां खेळाडूंपैकी एक आहे ज्यांच्यामुळे रशिया एकेकाळचे महान बुद्धिबळ राष्ट्र झाले आहे. ज्याने गेल्या दशकात नवीन तारे निर्माण करण्यासाठी संघर्ष केला आहे. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या संपूर्ण आक्रमणामुळे, देशातील अनेक आघाडीच्या खेळाडूंनी देश सोडला, फेडरेशन बदलले आणि उघडपणे युद्धाचा निषेध केला गेला.
दोन वेळा विश्वविजेतेपदाचा स्पर्धक असलेला नेपोम्नियाच्ची, हा सध्या जगातील उच्च श्रेणीतील २५ खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा एकमेव खेळाडू आहे. मुर्झिनचा रशियन बुद्धिबळ फेडरेशनशी बराच काळ वाद सुरू आहे आणि त्याने, एसिपेन्कोने त्यांच्याशी दीर्घ करार करण्यास नकार दिला आहे. त्याला सध्या एका बँकेने, प्रायोजित केले आहे आणि ‘फिडे’च्या तटस्थ ध्वजाखाली तो सहभागी होत असतो.
बुद्धिबळात अथवा कोणत्याही क्रीडाप्रकारात जर आपला पाल्य रस घेत असेल, तर त्याला प्रोत्साहित करणारे पालक आपल्याला देशोदेशी आढळतील. पण बुद्धिबळ हा सैतानाचा खेळ असल्याचे सांगत , आपल्या कुटुंबाशी सैतानासारखा वागवणारा बाप कोठे आढळत असेल, तर त्याला सैतान होण्यापासून रोखायची तयारी समाजानेही दाखवायला हवी का नको! कारण, तेपण एक धाडसच असते. आपण व्होलोदार मुर्झिन कुटुंंबातील अशा कौटुंबिक प्रश्नात पडायचे की नाही, हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा खचितच आहे.
श्रीपाद पेंडसे
(लेखातील माहितीचे सौजन्य ’चेस डॉट कॉम’)
इति!
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४