राजकीय स्वार्थासाठी सुरू असलेली भोंदूगिरी थांबवा!

20 Jan 2025 15:48:45
Ashish Shelar And Thackeray

मुंबई
: बांगलादेशी घुसखोर वांद्रे पश्चिमपर्यंत आले आहेत. ते वांद्रे पूर्वेकडे पोहोचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी सुरू असलेली भोंदूगिरी थांबवा, असा सल्ला देत माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी ‘उबाठा’ गटावर हल्लाबोल केला.

अभिनेते सैफ अली खान यांच्या घरी घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर उबाठा गटाकडून भाजपला लक्ष करण्याचा प्रयत्न झाला. त्याला उत्तर देताना आशिष शेलार यांनी ‘उबाठा’वर जोरदार पलटवार केला आहे. शेलार म्हणाले, ‘महाराष्ट्रात पहा चमत्कार… भोंदू हिंदुत्ववाद्यांचे ऐका नवे फुत्कार’; बांग्लादेशी घुसखोर वांद्र्यापर्यंत आले म्हणून उबाठाचे ‘छोटे आणि मोठे’ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाने बोटे मोडीत आहेत... वरुन आम्ही हिंदुत्व सोडले नाही म्हणून नेहमीच्या फुसक्या सोडायला पण विसरत नाहीत.

सभेत दाखवण्यापुरते हातात रुद्राक्षांच्या माळा घालून फिरणाऱ्या महाराष्ट्रातील भोंदू, मतलबी, स्वार्थी हिंदुत्ववाद्यांना आमचा थेट सवाल आहे. भाजपाची सत्ता असलेल्या आसाम, त्रिपुरामधून घुसखोरी होत नाही. मग घुसखोरी कुठून होते? उबाठाच्या प्रिय ममता दीदींची सत्ता असलेल्या पश्चिम बंगाल मधून. या राज्यात सीमा सुरक्षा दल तैनात करण्यास दिदींचा विरोध आहे. ‘उबाठा’ मग तुमच्या प्रिय दिदींना का विचारत नाही घुसखोरी बद्दल? असा सवाल शेलार त्यांनी केला आहे.

Powered By Sangraha 9.0