मुंबई : संजय राऊतांचे विधान हा राजकीय बालिशपणा आहे, असे प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिले. ते सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांच्या विधानावर पलटवार केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचा नवा 'उदय' होईल, असा दावा केला होता. तर संजय राऊतांनी उदय सामंत यांच्यासोबत २० आमदार असल्याचा दावा केला होता. यावर आता उदय सामंतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
उदय सामंत म्हणाले की, "संजय राऊतांनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य मी ऐकले. हा धादांत राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावात मी सामील होतो. त्यामुळेच मला दोनदा राज्याचे उद्योगमंत्रीपद मिळाले याची मला पूर्ण जाणीव आहे. एका सर्वसामान्य नेत्याने मला घडवण्यासाठी केलेले प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही. माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहे. त्यामुळे आमच्या दोघात वाद लावण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - सैफचा हल्लेखोर बांगलादेशी निघाल्याने रोहित पवारांना पोटशूळ!
फालतू षडयंत्र करू नये!
विजय वडेट्टीवारांच्या विधानावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, "एकनाथ शिंदे साहेब आणि मी सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालो आहोत. दोन सर्वसामान्य कुटुंबातील एकत्र असलेल्या लोकांना बाजूला करण्याचे फालतू षडयंत्र करू नका. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांनी केलेले वक्तव्य धादांत खोटे असून मी त्याचा निषेध करतो. मी एकनाथ शिंदेसाहेबांसोबत होतो आणि भविष्यात जेव्हा जेव्हा त्यांना गरज लागेल तेव्हा त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्या सोबत आहे. अशा षडयंत्रांना मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमजसुद्धा होणार नाहीत," असेही ते म्हणाले.