पालकमंत्रीपदाबाबत नाराजी नाही!

20 Jan 2025 19:48:57
 
Bawankule
 
मुंबई : महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून कुठलीही नाराजी नाही, असे स्पष्टीकरण महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार, २० जानेवारी रोजी दिले. त्यांनी मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "सातारा, संभाजीनगर, यवतमाळ येथे आमचे मंत्री असतानासुद्धा शिवसेनेला पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतला आहे. महायुतीचे सरकार हे समन्वयाने चालवावे लागते. ठाण्यापासून संपूर्ण कोकणच्या पट्ट्यात राष्ट्रवादीला कुठेच पालकमंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे सर्वानुमते त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नाशिक येथे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्याची मागणी असल्याने निर्णय घेण्यात आला."
 
"सत्तेतून बाहेर गेल्यानंतर विरोधकांचा मानसिक पराभव झाला आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या परिस्थितीतही ते नाहीत. त्यामुळेच ते सैफ अली खान यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे तसेच बीड आणि परभणी येथील घटनांचे राजकारण करत आहेत. वास्तविक, अशा घटनांचे कोणीही अजिबात राजकारण करू नये. विजय वडेट्टीवारांनी सध्या ५ वर्षे कुठलाही विचार करू नये. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी आमच्याकडे आणि आमच्या पक्षाकडे लक्ष न देता त्यांनी महाविकास आघाडीकडे लक्ष द्यावे," असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
 
ते पुढे म्हणाले की, "ज्या ज्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते त्यावेळी काही घटकांकडून महाराष्ट्र अशांत केला जातो. विरोधकांची महाराष्ट्र अशांत करण्याची नेहमीचीच वाईट सवय आहे. पण विरोधकांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आमचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे याला पुरून उरतील," असे ते म्हणाले.
 
सैफवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशीबाबत पवार-ठाकरेंकडचे नेते गप्प का?
 
"सैफ अली खान प्रकरणातील आरोपी बांग्लादेशी असो किंवा पाकिस्तानी तो एक आरोपी आहे. बांग्लादेशी आरोपीने इथे येऊन केलेल्या कृत्यावर सरकार कारवाई करत आहे. विरोधक अशा घटनांना जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करत होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या तीन-चार बोलबच्चन नेते ही घटना जातीवादाकडे घेऊन गेलेत. ते आता का बोलत नाहीत? सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी कोण आहे यावर विचार करून विरोधकांनी बोलायला हवे. आमचे सरकार योग्य पद्धतीने या घटनेवर न्याय करेल आणि मुंबईत पुन्हा अशा घटना घडणार नाही, यासाठी काम करेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0