मुंबई : वर्षाअखेरपर्यंत डगमगणाऱ्या शेअर बाजाराने गुरुवारी जोरदार उसळी घेतली. तब्बल १४३६च्या उसळीनंतर बाजार ७९,९४३.७१ अंशांवर बंद झाला. एनएसई मध्येही जोरदार तेजी दिसून आली. ४४५ अंशांची उसळी घेऊन, २४,१८८.६५ अंशांवर बंद झाला. गेले काही दिवस बाजारात सातत्याने घसरणच दिसून येत होती. परंतु गुरुवारी हे दडपण झुगारुन देत उत्साहात नव वर्षाचे स्वागत केले. बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, मारूती सुझुकी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली.
नवीन वर्षात भारतीय अर्थव्यवस्थाची सर्वच पातळ्यांवर प्रगती होणार असल्याचा अंदाज व्यक्त झाला असल्यामुळे शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. याशिवाय येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारकडून अधिक अपेक्षा ठेवत गुंतवणुकदारांनी हा उत्साह दाखवला आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. कररचनेत अजून सुधारणा होऊन ती अजून उद्योगस्नेही व्हावी, उद्योग धोरण अजून लवचिक व्हावे, आता पर्यंत झालेल्या सर्व करारांची अंमलबजावणी व्हावी. या सर्व अपेक्षा गुंतवणुकदारांकडुन होत आहेत.
इलेक्ट्रॉनिक क्षेत्र, मोबाईल, तसेच इतर गॅजेट्स यांच्या बद्दल धोरणनिर्मितीमध्ये लवचिकता येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेही गुंतवणुकदारांचा विश्वास परत येतो आहे. असेही निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. शेअर बाजारातील ही तेजी येत्या काळात कायम राहण्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे.