मुंबई : कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर सध्या तिच्या लग्नामुळे विशेष चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अंकिता प्रभू वालावलकर लवकरच कुणाल भगत सोबत लग्नबंधनात अडकणार असून त्यांची लग्नासाठी शॉपिंग सुरु झाली आहे. सोशल मिडियावरुन लग्नाच्या तयारीची अपडेट अंकिता देत असतेच. पण सध्या एक वेगळ्याच व्हिडिओमुळे अंकिता संतापली आहे. इन्स्टाग्राम शेअर केलेल्या एका व्हिडीओत अंकितासाठी मुंडावळ्या बनवल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर कमेंट करत अंकिताने सडेतोड उत्तर दिले आहे.
किर्ती आर्ट अँड क्राफ्ट नावाच्या एका इन्स्टाग्रामवर पेजवर मुंडावळ्यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरच्या लग्नासाठी स्पेशल कस्टमाइझ्ड युनिक आणि नाजूक अशा मुंडावळ्या,’ असा मजकूर या व्हिडीओवर लिहिला होता. तसेच अंकिताला टॅग करा असंही लिहिण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी अंकिताला कमेंट्समध्ये टॅग केलं. या पोस्टवर अंकिताने कमेंट करत तिने या मुंडावळ्या घेतलेल्या नाहीत, असं स्पष्ट केलं.
अंकिताने कमेंटमध्ये लिहिले आहे की,“मी फक्त एवढंच सांगेन की छान बिझनेस करा, पण खोटं बोलून करू नका. खोटं बोलून, माझं नाव वापरून बिझनेस केलेला मला आवडणार नाही. मी तुमच्याकडून मुंडावळ्या घेतलेल्या नाहीत. जे आमच्या लग्नासाठी खरंच मेहनत करत आहेत, त्यांना क्रेडिट मिळू द्या,” अशी कमेंट या पोस्टवर अंकिताने केली आहे.