कल्याण : १६० वर्षाची अविरत वाचन परंपरा असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पु. भा. भावे व्याख्यानमाले अंतर्गत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ४ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता ‘सामूहिक वाचन व कथन स्पर्धा’, ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ‘पुस्तक रसग्रहण चर्चासत्र’, ११ जानेवारी रोजी सकाळी ८: ३० वाजता ‘वाचन कौशल्य कार्यशाळा’ आणि १२ जानेवारी रोजी सायंकाळी ‘साहित्यिक मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. ‘सामूहिक वाचन व कथन स्पर्धा’ या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ साहित्यिका व प्रवचनकार सौ. प्राची गडकरी उपस्थित राहणार आहेत. ‘पुस्तक रसग्रहण चर्चासत्र’ या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश पवार उपस्थित राहणार आहेत. ‘वाचन कौशल्य कार्यशाळेला’ ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे-ओतूरकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावणार आहेत. ‘साहित्यिक मेळाव्यात’ कल्याणमधील सन्माननिय ज्येष्ठ साहित्यिक सहभागी होणार आहेत.