रोजगार क्षमतेची विशेष संधी देणारी - भारतीय कौशल्य विकास संस्था

    02-Jan-2025
Total Views |

Skill Development Institute of India
 
सद्यस्थितीत विद्यार्थी-युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या जोडीलाच कौशल्य विषयक शिक्षण-प्रशिक्षण देणे त्यांना अधिकाधिक रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने तितकेच आवश्यक आहे. बदलता काळ आणि वाढत्या कौशल्यविषयक गरजा लक्षात घेऊनच खासगी-सार्वजनिक सहभागातून उद्योगांना कौशल्यप्राप्त उमेदवार वेळेत प्राप्त व्हावेत, या मोठ्या व व्यावहारिक उद्देशांसह मुंबई येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स’ची स्थापना करण्यात आली आहे. त्याविषयी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्थापन करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य विद्यापीठात उद्योग-व्यवसायांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या कौशल्य विषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी स्थापनेनंतरच्या पहिल्या टप्प्यात खालील विशेष कौशल्य अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
 
अ‍ॅडव्हान्सड इंडस्ट्रियल ऑटोमेशन अ‍ॅण्ड रोबोटिक
इंडस्ट्रियल ऑटोमेशन फंडामेंटल
अ‍ॅडव्हान्सड आर्क वेल्डिंग टेक्निक
अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग
इलेक्ट्रिक वाहन बॅटरी विशेषज्ञ
दुचाकी व तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ
 
वरील कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा मुख्य उद्देश संबंधित क्षेत्रातील मूलभूत शैक्षणिक पात्रताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविणे हा आहे. कौशल्य विकास उपक्रमांचा अधिकाधिक व जागतिक स्तरावर परिणामकारक उपयोग व्हावा, या विशेष उद्देशाने देश-विदेशांतील मोठ्या व निवडक अशा मोठ्या व अवघड तांत्रिक व अवजड उद्योगांसाठी सर्वत्र आवश्यक असणार्‍या प्रगत कौशल्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. परिणामी, कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्ययावत कौशल्यप्राप्ती तर होईलच. त्याशिवाय नव्या व मोठ्या स्वरूपातील उद्योगांना कुशल कर्मचारी मिळण्याची दुहेरी सोय यानिमित्ताने कायमस्वरूपी झाली आहे.
 
‘भारतीय कौशल्य विकास संस्थे’च्या प्राधान्यक्रमात प्रस्तावित ‘इंडस्ट्री 4’च्या वाढत्या कौशल्यविषयक गरजांची पूर्तता करण्याचा धोरणात्मक व मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्देशाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी सुमारे पाच हजार युवकांना कौशल्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये मुख्य भर नव्या उद्योगांच्या कौशल्य गरजांची पूर्तता करण्यावर दिला जाईल. नव्या औद्योगिक गरजांनुरूप विकसित तंत्रज्ञानरूप आवश्यक कौशल्यांची पूर्तता याद्वारे होणार आहे.
 
या संदर्भातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ‘इंडस्ट्री 4’ मध्ये जागतिक स्तरावर आर्थिक, औद्योगिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने उद्योगांतर्गत प्रगत तंत्रज्ञानासह आधुनिक उत्पादन पद्धती निर्धारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी, संगणकीय पद्धती, रोबोटिक्सवर आधारित कार्यकुशलता, उत्पादन दर्जात विशेष सुधारणा, उत्पादकता वाढ व त्याद्वारे वाढता व्यावसायिक फायदा व मुख्य म्हणजे, मानवी श्रमाला तंत्रज्ञानाची प्रगत जोड देणे हा आहे. या उद्देशपूर्तीमध्ये ‘कौशल्य विकास संस्थे’चे अर्थातच मोठे योगदान राहील.
 
याशिवाय नव्या संदर्भातील ‘इंडस्ट्री 4’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची नवी व वाढती गरज लाभणार आहे. जागतिक स्पर्धेवर यशस्वीपणे मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा आणि तितकाच निर्णायक मुद्दा ठरणार आहे. त्यासाठी देखील कौशल्य विकासाचा मुद्दा पूर्वतयारी स्वरूपात महत्त्वाचा ठरणार आहे. कौशल्य विकासाचे महत्त्व यावरून पण स्पष्ट होते.
 
प्रत्यक्षात पाहता, आज जागतिक औद्योगिक क्षेत्रातच विशेषत: प्रमुख औद्योगिक क्षेत्रात कौशल्यपूर्ण कामगार-कर्मचार्‍यांची तशी वानवाच आहे. त्याचे परिणाम आर्थिक-व्यावसायिक संदर्भात प्रकर्षाने दिसून येतात. औद्योगिक विकासाला तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, ही बाब आता सर्वांनाच पुरतेपणी लक्षात आली आहे. बदलत्या व प्रगत तंत्रज्ञान व उत्पादन प्रक्रियांसाठी आवश्यक कौशल्य प्रचलित शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होताना दिसत नाही. म्हणूनच शैक्षणिक अभ्यासक्रम व उद्योगांसाठी आवश्यक असणार्‍या कौशल्यांमधील तफावतीची बहुतेक प्रगत उद्योगांमध्ये प्रयत्नपूर्वक मोजमाप आज जागतिक स्तरावरसुद्धा केली जात आहे.
 
भारताच्या संदर्भात प्रामुख्याने सांगायचे म्हणजे, सद्यस्थितीत भारतीय उद्योगांमध्ये संशोधनासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेले उद्योग, आधुनिक वैद्यकसेवा, डिझाईनसह इंजिनिअरिंग, वित्तीय सेवा, संगणकीय कार्यपद्धती, बांधकाम व विशेष मूलभूत सुविधा इ. क्षेत्रात कौशल्याची विशेष चणचण भासते. याचे होणारे दुहेरी परिणाम म्हणजे, एकीकडे या प्रमुख व उल्लेखनीय व्यवसाय-उद्योग क्षेत्रात कौशल्यपूर्ण कर्मचार्‍यांची कमतरता भासते, तर त्याचवेळी संबंधित क्षेत्रातील औपचारिक शिक्षण पूर्ण करणार्‍या हुशार उमेदवारांना केवळ अपेक्षित कौशल्याअभावी इच्छित नोकरी-रोजगार मिळू शकत नाही. थोडक्यात म्हणजे, दोन्ही कारणांचा उद्योग व उमेदवार या उभयतांवर परिणाम होतच आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या ‘भारतीय कौशल्य विकास संस्थे’च्या संदर्भातील पुढील टप्पे महत्त्वपूर्ण ठरतात.
 
कौशल्य विकास अभ्यासक्रम व प्रशिक्षण :
 
राष्ट्रीय स्तरावर विशेष धोरणात्मक बाब म्हणून स्थापन करण्यात आलेल्या या कौशल्य विकास व प्रशिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्यविषयक व भविष्यकाळातील गरजा लक्षात घेऊन, कौशल्य प्रशिक्षणाचे नियोजन-आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ‘राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थे’च्या विहित अभ्यासक्रमानुसार प्रचलित व आवश्यक अशा प्रस्तावित कौशल्य विकासांचा संतुलित समावेश करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये विशेष प्रात्यक्षित व प्रत्यक्ष सरावाचा समावेश असेल.
 
उद्योगांचा अधिक आणि सक्रिय सहभाग :
 
कौशल्य विकास अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होणार्‍या विद्यार्थी-उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणासह त्यांच्या क्षेत्राशी संबंधित असे करिअर विषयक सल्ला-मार्गदर्शन व संधी उपलब्ध होणार आहेत. याकामी संबंधित उद्योग व व्यवस्थापनातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने याचा मोठा लाभ उद्योग व उमेदवार या उभयतांना होणार आहे. यातूनच कौशल्य प्राप्त उमेदवारांना रोजगार व गरजू उद्योगांना उमेदवार मिळण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
 
व्यापक उद्देश आणि उद्दिष्ट : ‘भारतीय कौशल्य विकास संस्थे’च्या व्यापक उद्देशांमध्ये भारतीय उद्योग-व्यवसायांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्थेला विशेष गतिमान करण्याचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टांमध्ये आपल्याकडील विशेषत: अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयक कौशल्यांना जागतिक स्तरावर आपल्या कार्य-कौशल्याला गवसणी घालण्याची क्षमता निश्चितपणे आहे.
 
थोडक्यात म्हणजे ‘भारतीय कौशल्य विकास संस्थे’च्या माध्यमातून कौशल्य विकासाला नव्याने चालना देण्याचे मोठे व महनीय काम होणार आहे. पंतप्रधानांच्या प्रेरणेतून व सरकार आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सक्रिय सहभागातून उद्योग-व्यवसायाच्या राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्यपूर्तीसाठी गुणात्मक व दर्जात्मक स्वरूपात आता प्रयत्न होणार आहेेत.
 
दत्तात्रय  आंबुलकर