मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Shiv Naam Akhand Saptah) कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हडंबर येथे असलेल्या वीरनाथ मंदिराशी संबंधित नाथ संप्रदायाच्या अनुयायांनी आठवड्यापूर्वी कारसेवकपुरम संकुलात 'शिव नाम अखंड सप्ताह' सुरू केला होता. भगवान श्री रामलला यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून तसेच धूनी पूजनाने विधी सुरू झाला होता. दि. १ जानेवारी रोजी त्याची विधिवत सांगता झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ८० वर्षांपूर्वी सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि लोककल्याणासाठी हा विधी सुरू केला होता. सध्या नाथ संप्रदायाची पाचवी पिढी याची सुव्यवस्था राखत आहे. वर्षातील ४५ आठवडे चालणारा हा विधी दरवर्षी जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम, महाकालेश्वर, त्र्यंबकेश्वर यांसह १२ ज्योतिर्लिंग व नवनाथ मठांसह आसपासच्या परिसरात आयोजित केला जातो. अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.