संजय राऊतांना मातोश्रीवर मारहाण! म्हणाले, "मी आणि उद्धव ठाकरे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू"
02-Jan-2025
Total Views |
मुंबई : मी आणि उद्धव ठाकरे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. काही कार्यकर्त्यांसोबत वाद झाल्याने संजय राऊतांना मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोर मारहाण झाल्याच्या काही बातम्या व्हायरल झाल्या होत्या. यावर संजय राऊतांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले.
संजय राऊत म्हणाले की, "मी गेल्या काही दिवसांपासून आज मुंबईच्या बाहेर आलेलो आहे. अशा कोणत्याही बैठका मातोश्रीवर होत नाहीत. उद्धव ठाकरे काही लोकांना वन टू वन भेटत आहेत. आयटी सेलला काही कामधंदा उरलेला नाही. महाराष्ट्रात सुरु असलेल्या अंधार युगावरून त्यांना लक्ष विचलित करायचे आहे. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, सोमनाथ सुर्यवंशी या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी पैशांच्या जीवावर टोळ्या कामाला लावतात. मग त्यांना कधी शिवसेनेविषयी तर कधी संजय राऊतांविषयी बोलायला लावतात. पण मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे. त्यांच्या छाताडावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे. शिवसैनिक म्हणून माझे पाय मजबूत आहे."
"तुम्ही माझ्यावर कितीही हल्ले करा. मला तुरुंगात टाकले, माझी बदनामी करण्याच्या मोहिमा राबवल्या. आता हे नवीन राबवणार असाल तर जरूर याचा आनंद घ्या. मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत," असे ते म्हणाले.