शिमला : शिमल्यातील प्रसिद्ध कालीबारी मंदिर हे एक लोकप्रिय स्थळ आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. हे मंदिर पर्वतीय प्रदेशात वसलेले आहे. १८४५ मध्ये बांधले गेलेले हे कालीमातेचे मंदिर ‘श्यामला देवीचे मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. या श्यामला देवीच्या नावावरूनच या शहराला शिमला हे नाव पडले असे मानले जाते. शिमल्यातील काली बारी मंदिर हे भारतातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. जे लोक शिमल्यात येतात ते या मंदिराला भेट आवर्जून भेट देतात. कालीबारी मंदिर हे पूर्वी जाखू टेकडीवर वसलेले होते. ब्रिटीशांनी ते आता आहे त्या जागेवर आणले.
बंगाली ब्राह्मण "राम चरण ब्रह्मचारी" यांनी १८४५ साली शिमल्यातील जाखू टेकडीवरील रॉथनी कॅसलच्या परिसरात मूळ मंदिर बांधले होते असे सांगितले जाते. शिमल्याच्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, काली बारी मंदिरात देवीच्या सुंदर मूर्तीसह अद्वितीय हिंदू-शैलीतील वास्तुकला आहे.
शिमल्यातील स्थानिक रहिवाशांचा असा विश्वास आहे की पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्यामला मातेची पूजा केली की ती भक्तांची काळजी घेतात.