केंद्राच्या मदतीने आणि राज्यातील प्रशासनाच्या जोरावर ओमर अब्दुल्ला यांच्याकडून अनेकांना चांगल्या कामगिरीची, दमदार सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, या पातळीवर ओमर अब्दुल्ला सपशेल अपयशी ठरल्याचेच दिसून आले. एकूणच त्यांची पत्रकार परिषद ही सगळेच प्रश्न केंद्रावर टोलवण्यातच खर्ची पडली.
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका होऊन आता तीन महिने उलटले. पण, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या ओमर अब्दुल्ला यांना अद्याप जनतेचे प्रश्न सोडवायला वेळच मिळालेला दिसत नाही. एवढेच नाही, तर या तीन महिन्यांत ओमर यांची कामगिरीही सामान्य आणि संथच राहिली असल्याची चर्चा खोर्यात सध्या रंगली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी नुकतीच पत्रकार परिषदही आयोजित केली होती. त्यातही राज्य सरकारच्या कुर्मगतीने होणार्या कामकाजाकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता, ओमर यांनी सरकारी शैथिल्याचे खापर थेट केंद्र सरकारवर फोडले. “जोपर्यंत जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होत नाही, तोपर्यंत काश्मीरमधील समस्या सुटू शकत नाही,” असे त्यांचे म्हणणे. खरं तर केंद्राच्या मदतीने आणि राज्यातील प्रशासनाच्या जोरावर ओमर अब्दुल्ला यांच्याकडून अनेकांना चांगल्या कामगिरीची, दमदार सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, या पातळीवर ओमर अब्दुल्ला सपशेल अपयशी ठरल्याचेच दिसून आले. एकूणच त्यांची पत्रकार परिषद ही सगळेच प्रश्न केंद्रावर टोलवण्यातच खर्ची पडली.
ओमर अब्दुल्ला काही राजकारणात नवखे नाही. यापूर्वीही 2009 ते 2015 या काळात ओमर यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे ऑक्टोबर 2024 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून ते युद्धपातळीवर काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी झटतील, अशी अपेक्षा होती. परंतु, राज्याचा गाढा हाकणे सोडाच, पण त्यासाठीचे नियोजन, व्यवस्थापन याबाबतही ओमर कमी पडलेले दिसतात. त्यामुळेच तीन महिने उलटून गेले तरी ओमर यांना नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेला दिसतो. त्यामुळे विकासकामे, रोजगार अशा सगळ्याच मुद्द्यांवर ओमर यांनी केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचेच उद्योग केले. म्हणजे काश्मीरमधील रोजगारनिर्मितीविषयी प्रश्न विचारला असता, आता ‘काश्मीरमध्ये बाहेरचे लोक येतात, म्हणून स्थानिकांना रोजगार मिळत नाही,’ अशी ओरड त्यांनी केली. तसेच ‘काश्मीर प्रश्न’ अजूनही सुटलेला नाही. कारण, पाकव्याप्त काश्मीर अजून भारताच्या नियंत्रणात नाही, अशी विधाने करुन, आपले अपयश झाकण्यातच ओमर यांनी अख्खी पत्रकार परिषद खर्ची घातली. त्यामुळे सरकारही सांभाळत नाही आणि पक्षपातळीवरही सगळा उल्हास, अशी ओमर यांची स्थिती!
नेते आवरेना...
एकीकडे सरकारी पातळीवर ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री म्हणून आपला ठसा उमटविण्यात अपयशी ठरले असताना, पक्षपातळीवरही त्यांना आपला प्रभाव टिकवता आलेला नाही. कारण, त्यांच्याच नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे श्रीनगरचे खासदार आगा सय्यद रुहुल्लाह मेहदी यांनी काश्मीर सरकारच्या आरक्षणसंबंधी धोरणाचा मागे जाहीर निषेध नोंदवला. ओमर यांच्या बंगल्याबाहेर जमलेले विद्यार्थी आणि विरोधकांच्या सूरात सूर मिळवताना हे मेहदी महाशय दिसले. यावेळी ‘मी जनतेसोबत कायम उभा राहीन,’ असेही मेहदी म्हणाले. तसेच ओमर सरकारच्या आरक्षणसंबंधी धोरणांवरही त्यांनी कडाडून टीका केली.
काश्मीरमधून ‘कलम 370’ हटविल्यानंतर केंद्र सरकारने तेथील आरक्षणातही मूलभूत बदल केले. त्यामुळे आता राज्यात सरकार अस्तित्वात आल्याने, त्यांनी केंद्राने केलेले आरक्षणसंबंधी बदल रद्दबातल ठरवावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह विरोधकही रस्त्यावर उतरले होते. त्याच निदर्शनांमध्ये चक्क सत्ताधारी पक्षाचा खासदार सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याचे कारण म्हणजे, मेहदी यांची काश्मीरमधील तरुणांमधील लोकप्रियता. त्यातच मेहदी हे शिया समुदायाचे असल्यामुळेही नॅशनल कॉन्फरन्समधील शिया चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे मेहदी यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजीचे सूरही उमटले. मेहदी यांनी निदर्शनांमध्ये सहभागी होण्यापेक्षा, ओमर यांच्याशी चर्चेतून हा प्रश्न मांडायला हवा होता, अशा प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. ओमर यांनीही ‘लोकशाहीत प्रत्येकाला निषेध नोंदवण्याचा अधिकार आहे,’ एवढीच प्रतिक्रिया नोंदवून मेहदी यांच्या कृत्याला फार महत्त्व दिले नाही. पण, तरीही मेहदी यांच्यामुळे नॅशनल कॉन्फरन्समध्ये फूट पडेल वगैरे अंदाजही वर्तविण्यात आले होते. भाजपच्या काश्मीरमधील नेत्यांनीही कुणाचेही नाव न घेता, याकडे अंगुलीनिर्देश केला होता. पण, नुकतीच मेहदी यांनी पर्यटनासंबंधी घेतलेल्या एका प्रशासकीय बैठकीत नॅशनल कॉन्फरन्सचा केवळ एकच आमदार सहभागी झाला. त्यामुळे मेहदी यांच्या पाठीशी पक्षातील नेत्यांचे पाठबळ नसल्याचेच स्पष्ट होते. पण, यांसारख्या नाराज नेत्यांची लाट उसळू नये, म्हणून ओमर यांना पक्षावरील आपली पकड अधिक मजबूत करावी लागणार, हे नक्की!