न्यायालयाच्या सुनावणीनंतर इस्कॉनची मोठी प्रतिक्रिया

    02-Jan-2025
Total Views |

ISKCON Chinmay Krishna Das

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ISKCON on Chinmay Krishna Das)
इस्कॉन प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गुरुवार, दि. २ जानेवारी रोजी त्यांच्या जामीनावर सुनावणी झाली. मात्र त्यांना अद्यापही जामीन मंजूर झालेला नाही. यावर इस्कॉनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'सुनावणीदरम्यान एक चांगली गोष्ट म्हणजे हिंदू वकिलांना चिन्मय दास यांची बाजू न्यायालयात मांडता आली. यापूर्वी सुनावणीदरम्यान वकिलांना त्यांची बाजू मांडण्याची परवानगी नव्हती, असे इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास म्हणाले.

हे वाचलंत का? : युनुस सरकारची मुस्कटदाबी; चिन्मय दास यांना जामीन नाहीच

चिन्मय कृष्ण दासचे वकील आता बांगलादेशच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे राधारमण दास यांनी सांगितले. उच्च न्यायालयात याचिकेच्या सुनावणीदरम्यान बांगलादेशचे अंतरिम सरकार चिन्मय दास यांच्या वकिलांना न्यायालयाच्या आवारात आणि बाहेर पुरेशी सुरक्षा पुरवेल, अशी आशाही त्यांनी पुढे व्यक्त केली.

चिन्मय कृष्ण दास यांना दि. २५ नोव्हेंबर रोजी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गेल्या ४० दिवसांपासून बांगलादेशच्या तुरुंगात असलेल्या चिन्मय दास यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.