मुंबई : सैफ खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात १९ जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाच्या संशयित बांगलादेशी घुसखोराला ठाण्याहून अटक केली होती. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार १६ जानेवारी रोजी पहाटे वांद्रे पश्चिम येथील अभिनेत्याच्या घरात घुसून हल्ला केल्याची त्याने कबुली दिली. एका अधिकृत निवेदनात, मुंबई पोलिसांनी सांगितले की सदर आरोपीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला आणि बनावट हिंदू ओळखपत्र वापरून तो काम करत होता.
रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी माध्यमांशी बोलताना डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले “१६ जानेवारी रोजी पहाटे २ वाजता अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला. या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे, सदर आरोपी ३० वर्षांचा आहे असून, तो दरोड्याच्या उद्देशाने घरात घुसला होता." त्याच बरोबर गेडाम म्हणाले की सदर आरोपी हा मूळचा बांगलादेशी असून, ५ ते ६ महिन्यांपूर्वी मुंबईत राहायला आला होता. विजय दास हे बनावट नाव धरून करून तो घरकाम करीत असे. त्याच्याकडे भारतीयत्वचे वैध पुरावे नसून, तो बांगलादेशी नागरिक असल्याचे दर्शवणारे साहित्य निर्दशनास आले आहे. सदर आरोपी हा ठाणे येथील एका पबमध्ये कर्मचारी असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याचा माग काढला असता तो हिरानंदानी इस्टेटमधील मेट्रो बांधकाम साइटजवळील कामगार छावणीत होता. अधिकाऱ्यांच्या मते, आरोपी हा पश्चिम बंगालमधून मुंबईत आला आणि तो बिजॉय दास, विजय दास, मोहम्मद इलियास आणि बीजे अशी अनेक बनावट नावं वापरत होता.
५४ वर्षीय लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान हल्लेखोराचा सामना करत असताना त्याच्या मानेला आणि मणक्याला दुखापत झाली. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.