क्रेडाई बीएएनएम नवी मुंबई आणि क्रेडाई बीएएनएम रायगड संयुक्तपणे करणार मेगा प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन!

19 Jan 2025 12:23:17

credai

मुंबई : नवी मुंबई आणि रायगड या क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोठ्या संस्था अशी ओळख असणाऱ्या क्रेडाई बीएएनएम नवी मुंबई आणि क्रेडाई बीएएनएम रायगड या दोन्ही संस्थांकडून २३ व्या मेगा प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी तुर्भे येथील न्यू हॉटेल येथे शनिवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. २४ ते २७ जानेवारी या काळात सीवूड्स, ऑफ पाम बीच रोड, नवी मुंबई येथे हा भव्य एक्स्पोचे आयोजन होणार आहे. यामध्ये १५ लाख ते २५ कोटी या पर्यंतच्या विविध रहिवासी तसेच प्लॉटस् मालमत्ता उपलब्ध असणार आहेत. यात नवी मुंबई आणि रायगड मधील ५०० पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिक सहभाग घेणार आहेत. या एक्सपोची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम असणार आहे. या पत्रकार परिषदेला क्रेडाई बीएएनएम नवी मुंबई चे अध्यक्ष वसंत भद्रा, क्रेडाई बीएएनएम रायगड चे अध्यक्ष आश्विन पटेल, या एक्स्पोचे संयोजक प्रवीण पटेल, क्रेडाई बीएएनएम नवी मुंबईचे सचिव जिगर त्रिवेदी आणि विविध बांधकाम व्यावसायिक, दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबईत होणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे नवी मुंबईचे नाव हे जगाच्या नकाशावर आले आहे. या शहरात सर्वच सुविधा मिळत असल्याने नवी मुंबई हे कायमच लोकांच्या पसंतीचे शहर असते. या एक्स्पोच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर घेण्याची संधी निश्चित उपलब्ध होईल. असे मत क्रेडाई बीएएनएम नवी मुंबईचे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी मांडले. या एक्स्पो मुळे लोकांना एकाच छताखाली सर्वच सुविधा एकत्र मिळून त्यांना त्यांच्या पसंतीचे घर निवडण्यासाठी मदत होणार आहे.यामुळे नागरिकांना याचा नक्कीच लाभ होईल असे मत क्रेडाई बीएएनएम रायगडचे अध्यक्ष आश्विन पटेल यांनी मांडले. घर घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आर्थिक गणितांची जुळवाजुळव करण्यासाठी १० पेक्षा जास्त बँका या एक्स्पो मध्ये सहभागी होणार आहेत.
 
आतापर्यंत या दोन्ही संस्था वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत होत्या पण क्रेडाई बीएएनएम नवी मुंबई चे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी या एकत्रित एक्स्पोची संकल्पना मांडली आणि हा भव्य एक्स्पो साकार होतो आहे. या एक्स्पो मधून ग्राहकांना नवी मुंबई तसेच रायगड मधील कर्जत, खोपोली पर्यंतच्या मालमत्ता बघायला मिळतील. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या एक्स्पो भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


Powered By Sangraha 9.0