‘सिनेमॅन’ : मुलांसाठी चित्रपटनिवडीचा नीरक्षीर विवेक

18 Jan 2025 10:38:38
Cineman

चित्रपट हे जरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे माध्यम असले, तरी त्यातून जीवन जगण्याचे विविध दृष्टिकोन समोर येतात. चित्रपटाची निर्मिती ही प्रेक्षकांना आकर्षित करणारी आणि गुंतवून ठेवणारी असावी, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘सिनेमॅन’ हा चित्रपट. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन उमेश मोहन बागडे यांनी केले असून २१व्या ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शन करण्यात आले. त्यानिमित्ताने या आगळ्यावेगळ्या चित्रपटाविषयी...

सिनेमॅन’ या चित्रपटाचे कथानक आनंद म्हणजेच किशोर कदम आणि त्यांचे चित्रपटांवरील प्रेम यांवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेते सिद्धार्थ बदी, रिचर्ड क्लेन, रिकी वूड, (बालकलाकार) पृथ्वीराज चव्हाण आणि (लोकप्रिय अभिनेते) किशोर कदम या प्रमुख भूमिका साकारताना दिसून येतात. त्याचबरोबर चित्रपटात काम करणारी शाळकरी मुलेही तिकडची स्थानिक असली, तरी त्यांचा नैसर्गिक अभिनय मनाला अधिक भावतो आणि याचे सर्व श्रेय हे चित्रपटाच्या दिग्दर्शकाला द्यावे लागेल.
’सिनेमॅन’च्या अनोख्या कथानकाचा प्रवास हा या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच आकर्षक आहे. चित्रपटात आनंद लहान मुलांकरिता योग्य असलेले चित्रपट दाखवण्यासाठी फार लांबचा पल्ला गाठतात. त्या चित्रपटातून लहान मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून त्यांना अगदी जग जिंकल्यासारखे वाटते. अशा या गावागावांत चित्रपट घेऊन जाणार्‍या सामान्य माणसाची कहाणी म्हणजेच ’सिनेमॅन.’

आनंद शिक्षण क्षेत्रातून निवृत्ती घेऊन ‘चिल्ड्रेन फिल्म क्लब’चे (सीएफसी) सदस्य होतात. गावातील मुलांना योग्य प्रकारचे चित्रपट दाखवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात. आधुनिक काळातील बदललेले चित्रपट पाहण्याचे स्वरुप आणि त्याचे मुलांवर होणारे बरे-वाईट परिणाम यांवर चित्रपटात प्रभावी भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटातील काही प्रसंग अक्षरश: अंगावर शहारे आणतात. प्रसंगांसोबत संगीताची घातलेली सांगड नकळतपणे प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

या चित्रपटातील एका प्रसंगाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. शाळेतल्या मुलांना शिकवण्याची पद्धत बरेचदा विद्यार्थीकेंद्रित नसल्याने मुले अभ्यासाचा कंटाळा करतात. मात्र, अशावेळी आनंद तिथे येऊन लहान मुलांप्रमाणे हावभाव करत त्यांना शिकवायला लागतात. मुलांना त्यांच्या पद्धतीने एखादी गोष्ट समजावली, तर ती त्यांना अधिक चांगली समजते. मग तो अभ्यास असो वा संस्कार, हाच संदेश या प्रसंगातून दिग्दर्शकाने दिला आहे.

सध्याच्या चित्रपटांचे लहान मुलांवरील परिणाम हे बरेचदा पालकांची चिंता वाढवणारे ठरतात. ‘स्टंट’ आणि ‘अ‍ॅक्शन’ने खच्च भरलेले चित्रपट पाहून लहान मुलेही अशा हिंसात्मक कृतींकडे प्रवृत्त होतात आणि त्या करताना त्यांना दुखापतही होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांसाठी चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन आहे, की त्यातून त्यांना योग्य शिक्षण मिळेल, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल, हे तपासणे खूप महत्त्वाचे. याच विचारधारेतून उभा राहिलेला मराठी चित्रपट ‘सिनेमॅन’, जो लहान मुलांच्या योग्य विकासासाठी, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम करणार्‍या विषयांवर आधारित आहे. या पार्श्वभूमीवर ‘सिनेमॅन’ हा चित्रपट पालकांना विचार करायला लावतो की, आपल्या मुलांसाठी आपण कोणते चित्रपट निवडतो, ते त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा परिणाम करतात आणि त्यातून त्यांना नेमके काय शिकायला मिळते. या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या लेखकाने पात्रांच्या संवादातून अगदी सफाईदारपणे मांडली आहेत. चित्रपटातले संवाद सहज, प्रभावशाली आणि तितकेच बोलके आहेत. चित्रपटाची कथा अगदी साधी-सोपी जरी वाटत असली, तरी तिची मांडणी तितकीच वेगळी व आकर्षक ठरावी.

एकूणच ‘सिनेमॅन’ हा चित्रपट बालमनाची संवेदनशीलता ओळखून त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करण्याचे काम करतो. यातून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे, त्यांना नैतिकता शिकवणारे आणि त्यांचा बौद्धिक विकास साधणारे चित्रपट निवडण्याचा आग्रह करण्यात आला आहे.

खेड्यापाड्यातील काही छोट्या गावांत अजूनही सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या दिसून येत नाहीत. अगदी त्यांची शाळासुद्धा एका पडक्या घरात भरते. त्यात मुलांची पटसंख्या कमी. अशा काही सामाजिक समस्यांवर सुद्धा या चित्रपटातून दिग्दर्शकाने चपखलपणे बोट ठेवले आहे. ‘सिनेमॅन’ चित्रपटाचे चित्रिकरण गावाकडील पार्श्वभूमीवर केले असून, त्यामध्ये ग्रामीण भागाचे सौंदर्य कमालीचे टिपले आहे. प्रत्येक दृश्य इतके नैसर्गिक आणि जीवंत वाटते की प्रेक्षकाला प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी असल्याचा अनुभव येतो. जुन्या शाळा, गावातील रस्ते, डोंगराच्या पायथ्याशी असलेली छोटीशी वस्ती आणि हिरव्यागार निसर्गरम्य दृश्यांमुळे चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना भारावून टाकते.

‘सिनेमॅन’ या चित्रपटाचे निर्माते सुमित पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, हा चित्रपट मोठमोठ्या फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होणार असून, कालांतराने चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा विचार आहे.

‘सिनेमॅन’ या चित्रपटाकडे मुलांच्या मनोरंजनाच्या निवडीवर पुनर्विचार करण्यास प्रवृत्त करणारा एक महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणून बघावे लागेल. मुलांच्या संवेदनशील वयाचा विचार करून त्यांना योग्य संस्कार देणारे आणि त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी आधारभूत ठरणारे चित्रपट निवडणे ही आजच्या काळाची गरज म्हणावी लागेल. ‘सिनेमॅन’ हा चित्रपट या गरजेला प्रभावीपणे अधोरेखित करतो आणि प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ टिकणारा प्रभाव निर्माण करतो, हे निश्चित!

अनिरुद्ध गांधी
चित्रपट : सिनेमॅन
लेखक व दिग्दर्शक : उमेश मोहन बागडे
कलाकार : किशोर कदम, पृथ्वीराज चव्हाण, सिद्धार्थ बदी, रिचर्ड क्लेन, रिकी वूड
रेटिंग : ****
Powered By Sangraha 9.0