मुंबई : (Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या २६ जानेवारीपूर्वी दिला जाणार आहे. तसेच या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावाला राज्या मंत्रिमंडळाने गुरुवारी दि. १६ जानेवारी रोजी मान्यता दिली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेचा महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप या लाभार्थीना प्राप्त नसून हा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाभार्थींचे लक्ष लागले आहे. मात्र आता या योजनेतील सर्व पात्र महिलांना २६ जानेवारी पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच जुलै २०२४ मध्ये राज्य सरकारने या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातील २.४६ कोटी महिलांना आतापर्यंत १५०० रुपये मिळाले आहेत.