पुढच्या ८ दिवसांत उबाठा गटातून शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होणार!

17 Jan 2025 15:41:46
 
Uday Samant
 
रत्नागिरी : पुढच्या ८ दिवसांत उबाठा गटातून शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शुक्रवार, १७ जानेवारी रोजी त्यांनी रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "१८ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर आहेत. मी १९ तारखेला दावोसला जाणार आहे. २४ तारखेला मी दावोसवरून परत येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत वाट पाहावी. पुढच्या ८ दिवसांत उबाठा गटातून जनतेला अपेक्षित असलेला फार मोठा पक्षप्रवेश होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता वाटते की, आम्ही सच्चे होतो. त्यांच्या हे लक्षात आल्याने आता उबाठा गटातील लोक आमच्याकडे येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे भविष्य सांगायचे झाल्यास जशी शिवसेनेची काँग्रेस झाली तशी उबाठा गटाची संघटनात्मक काँग्रेस झाल्याचे या जिल्ह्यात पाहायला मिळेल," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर!
 
भास्कर जाधवांचे मार्गदर्शन मिळाल्यास फायदाचेच!
 
"शिवसेनेची काँग्रेस झाली, असे भास्कर जाधव म्हणाले होते. पण शिवसेनेची ३ वर्षांपूर्वीच काँग्रेस झाली असल्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा जपत धनुष्यबाण घेऊन काम करत आहोत. भास्कर जाधव यांची आज जी कुटंबणा होत आहे तीच तीन वर्षांपूर्वी आमची झाली होती. त्यामुळे आम्ही उठाव केला होता. जर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जेष्ठ नेते भास्कर जाधव यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले तर आमच्यासाठी मौलिक आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला मिळाल्यास ते सगळ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे," असेही उदय सामंत म्हणाले.
 
विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीवर जाती-धर्माचे राजकारण!
 
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्लानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, "विरोधकांना हल्ली प्रत्येक गोष्टीचे जात धर्मावरच राजकारण करायचे आहे. सैफ अली खानच्या घरात शिरलेली व्यक्ती कशासाठी शिरली? याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला जातीय स्पर्श करण्याचे कारण नाही. कारण आता ५ वर्षांनंतर विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत आणि जनतेने आम्हाला फार मोठा २३७ आमदारांचा जनादेश दिला आहे."
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीतच लढणार!
 
"एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका म्हणजे शिवसेनेची भूमिका आहे. ग्रामपंचायतींपासून तर खासदारकीच्या निवडणूकीपर्यंत महायुती म्हणून लढण्याची आमची तयारी आहे. कारण आम्ही आमच्या निवडणूकांवेळी युती केली आणि कार्यकर्त्यांच्या निवडणूकांमध्ये स्वतंत्र लढलो तर त्यातून गैरसमज निर्माण होतो. स्वत:ची आमदारकी आणि खासदारकी टिकवण्यासाठी महायुती होते आणि कार्यकर्त्यांच्या निवडणूकीवेळी स्वतंत्र लढतात अशी भावना महायुतीच्या कार्यकर्त्यांची होऊ नये, याची दक्षता तिन्ही पक्ष घेणार आहेत," असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0