विजेच्या धक्क्याने 'एन-११'चा मृत्यू; ताडोबा ते तामिळनाडू प्रवास केलेल्या गिधाडाचा करुण अंत

16 Jan 2025 19:08:44
tadoba vulture
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील ताडोबा ते तामिळनाडू असा चार हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या 'एन-११' या गिधाडाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे (tadoba vulture). गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी या गिधाडाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह तामिळनाडूमधील अरिमलम थंजूर या गावात आढळला (tadoba vulture). या घटनेमुळे विजेच्या उन्नत तारा या गिधाडांसारख्या मोठ्या पक्ष्यांच्या जीवावर उठत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. (tadoba vulture)
 
 
उचांवरुन जाणाऱ्या विजेच्या उंच तारा भूमीगत करण्याचे किंवा त्यावर बर्ड डायव्हर्टर लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या तारांमध्ये अडकून विजेचा धक्का लागून माळढोक, तणमोर आणि गिधाडांसारख्या मोठ्या आणि संकटग्रस्त पक्ष्यांचा जीव जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता 'एन-११' या गिधाडाचा देखील त्यामध्ये समावेश झाला आहे. 'बीएनएचएस'ने या गिधाडाची पैदास पिंजोर येथील गिधाड प्रजनन केंद्रात केली होती. आॅगस्ट, २०२४ रोजी या गिधाडाला 'जीपीएस टॅग' लावून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. त्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, आंधप्रदेश या राज्यातून चार हजार किलोमीटरचा प्रवास करुन तामिळनाडू गाठले होते. गेल्या तीन आठवड्यांपासून हे गिधाड कलसपाक्कम तालुक्यात होते.
 
 
गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी या गिधाडाचा मृतदेह पुडुकोट्टई विभागातील अरिमलम थंजूर गावातील तिरुमायम वनपरिक्षेत्रामधील वीज वाहक तारांच्या खाली आढळला. गेले काही दिवस या गिधाडाचे एकाच जागेवरील लोकेशन मिळत असल्याने आम्ही शोधमोहिम राबवली आणि त्यावेळी आम्हाला त्याचा जळालेला मृतदेह आढळून आल्याचे 'बीएनएचएस'चे संचालक किशोर रिठे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले. वीज वाहक तारा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या मृत्यू झाल्याची शक्यता रिठे यांनी वर्तवली आहे. गिधाडाचा मृतदेह तिरुमायम रेंजच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला आणि सहाय्यक पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांनी त्याचे शवविच्छेदन केले.
Powered By Sangraha 9.0