नागपूर रेल्वे स्थानकाची शतकपूर्ती

16 Jan 2025 11:37:29

nagpur railway


नागपूर, दि.१६ : प्रतिनिधी 
भारतीय रेल्वेचे एक प्रमुख केंद्र असणारे नागपूर रेल्वे स्थानक सेवा क्षेत्रात गौरवशाली १०० वर्षे पूर्ण करत आहे. हे स्थानक १५ जानेवारी १९२५रोजी तत्कालीन मध्य प्रांतांचे राज्यपाल सर फ्रॅंक स्लाय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून हे स्थानक भारताच्या रेल्वे जाळ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उभे आहे.
हावडा-मुंबई आणि दिल्ली-चेन्नई मार्गांच्या संगमावर स्थित, नागपूर रेल्वे स्थानक देशाच्या परिवहन नकाशावर एक महत्त्वाचे जंक्शन आहे. याठिकाणी असलेले प्रसिद्ध डायमंड क्रॉसिंग हे स्थानक देशाच्या विविध भागांना जोडणारी त्याची अनोखी भूमिका अधोरेखित करते. गेल्या अनेक वर्षांत, नागपूर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक व्यस्त स्थानकांपैकी एक बनले आहे. नागपूर रेल्वे स्थानकाचा प्रवास १८६७ साली सुरू झाला, जेव्हा रेल्वे नागपूरला पोहोचली. १९२० साली याला "नागपूर जंक्शन" नाव देण्यात आले आणि त्याच वर्षी महात्मा गांधी असहकार आंदोलनादरम्यान येथे आले होते. १९२५ साली उद्घाटन झालेली सध्याची इमारत आजही भारताच्या परिवहन इतिहासात नागपूरच्या स्थायी वारशाचे प्रतीक आहे.
सध्या हे स्थानक दररोज सरासरी २८३ गाड्यांचे व्यवस्थापन करते, ज्यापैकी ९६ गाड्या येथे सुरू होतात किंवा समाप्त होतात आणि १८ गाड्या याच ठिकाणाहून प्रारंभ करतात. आर्थिक वर्ष २०२३-२४ दरम्यान, याठिकाणी २.३६ कोटी प्रवाशांची नोंद झाली, जे दररोज सरासरी ६४,५४१ प्रवासी होते. चालू आर्थिक वर्षात ही संख्या ६८,७२९ प्रवाशांपर्यंत वाढली आहे.
नागपूर रेल्वे स्थानक मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर आहे. डिसेंबर २०२२मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेल्या ₹४८८ कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत या स्थानकाला जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधांनी सुसज्ज केले जात आहे. डिसेंबर २०२२ मध्ये प्रतिष्ठित वंदे भारत एक्सप्रेसच्या सुरुवातीसह या स्थानकाच्या आधुनिकीकरण प्रयत्नांना आणखी गती मिळाली आहे. नागपूर रेल्वे स्थानक आपल्या शतकपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना, हे स्थानक वाढीचा दीपस्तंभ आणि भारताच्या रेल्वे अधोसंरचनेचा मुख्य आधार राहील. समृद्ध वारसा, वाढती प्रवासी संख्या आणि उज्ज्वल भविष्याची दृष्टी असलेल्या या स्थानकाला पुढील अनेक वर्षे सेवा आणि जोडणीचे प्रतीक होण्याचा वारसा कायम ठेवता येईल, अशी भावना मध्य रेल्वेने व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0