भारतीय शेअर बाजाराची उसळीची हॅटट्रिक, तीनशे अंशांची जोरदार उसळी

16 Jan 2025 19:31:33

 

 
share
 
 
 
 
मुंबई : भारतीय शेअर बाजाराने सलग तिसऱ्या दिवशीही म्हणजेच गुरुवारीही वाढीचा सिलसिला कायम ठेवत ३१८ अंशांची उसळी घेत ७७,०४२ चा टप्पा गाठला. निफ्टीमध्येही ९८ अंशांची वाढ होत २३,३११ अंशांचा टप्पा गाठला. जागतिक स्तरावर वादग्रस्त ठरलेल्या हिंडेनबर्ग रिसर्च या गुंतवणुकदार कंपनी बंद करण्याची घोषणा कंपनीचे संस्थापक अँडरसन यांनी केली असल्याने अदानी समुहाच्या सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. त्याबरोबर जवळपास दोन वर्षे चाललेल्या इस्त्राइल – हमास युध्दाने युध्दविरामाकडे केलेली वाटचाल, अमेरिकी शेअर बाजारांनी घेतलेली उसळी यासर्वच गोष्टींचा अपेक्षित चांगला परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला.
 

भारतीय उद्योग क्षेत्राने गेल्या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत दमदार कामगिरी केल्यामुळे ऍक्सिस, आयडीबीआय, एचडीएफसी या प्रमुख बँकांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. भारतीय अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा यांमुळे भारतीय गुंतवणुकदारांकडून गुंतवणुकीवर विश्वास व्यक्त केला आहे. या कंपन्यांच्या बरोबर इन्फोसिस, रिलायन्स या कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढच झाली. भारतातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा रेल्वेसाठी जादा तरतूद केली जाण्याची शक्यता असल्याने रेल्वेच्या शेअर्समध्येही वाढ झाली.

 

हिंडेनबर्गला टाळे लागण्याच्या घोषणेने अदानी समुहाच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ

 

जगभरात वादग्रस्त ठरलेली हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेला टाळं लावण्याची घोषणा कंपनीचे संस्थापक अँडरसन यांनी केल्यामुळे अदानी समुहाच्या शेअर्स मध्ये जोरदार उसळी दिसली. एकूण ७ टक्क्यांची वाढ अदानी समुहाच्या शेअर्समध्ये झाली. अदानी पोर्ट्स १.९४ टक्के, अदानी पॉवर २.३४ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी ३.४० टक्के या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक अँडरसन यांनी आपल्याला सतत भेडसावत असलेल्या आर्थिक चणचणीमुळे कंपनी बंद करत असल्याची घोषणा केली आहे. समाजमाध्यमावर तशी पोस्ट शेअर केली आहे. याच कंपनीकडून भारतातील आघाडीचा उद्योगसमुह आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावर कर्जबाजारीपणाचा आरोप केला होता.

 
 
 
 
Powered By Sangraha 9.0