सायबर भामट्यांनी वर्षभरात केली १६२ कोटींची फसवणूक

16 Jan 2025 21:44:31
 
Cyber ​​crime
 
ठाणे : गुन्हेगारी क्षेत्रातही आता गुन्हेगार नवनवे तंत्रज्ञान वापरून गुन्हे करीत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करीत असले तरी, विविध तांत्रिक फंडे वापरून मागील वर्षभरात नागरीकांची तब्बल १६२ कोटींची फसवणुक केल्याचे समोर आले आहे. वाढते गुन्हे आणि कोट्यवधींची फसवणुक यामुळे सायबर चोरटयांनी एक प्रकारे ठाणे पोलिसांना आव्हान दिले आहे. मात्र ठाणे पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष सायबर सुरक्षा पथक तयार केले आहे.
 
वाढत्या सायबर गुन्हेगारांच्या आव्हानाला सडेतोड उत्तर देण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस मुख्यालयाजवळ नवीन इमारतीत सायबर पोलीस ठाणे सुरु केले आहे. तसेच सायबर गुन्हे आणि तपासासाठी निष्णांत अधिकार्यांचे विशेष दल तयार केले आहे. या सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करून तांत्रिक तपास केला जात आहे.
 
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सन २०२४ या वर्षात तब्बल ७१९ सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असुन यापैकी केवळ ३९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश लाभले. या गुन्हयात ठाणेकरांच्या बँक खात्यातील तब्बल १६२ कोटीची रक्कम सायबर गुन्हेगारांनी लुटल्याची माहिती आहे. दाखल एकूण ७१९ सायबर गुन्ह्यामध्ये टास्क फ्रॉडचे ५८ गुन्हे, शेअर ट्रेडिंगचे ११६ गुन्हे, कुरिअर फ्रॉडचे २६ गुन्हे तर डिजिटलचे ५० आणि ४६९ इतर सायबर गुन्हे दाखल आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0