संभल हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ६० आरोपींवर कारवाई!
14 Jan 2025 12:25:28
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या संभळ येथे २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. अनेक पोलीस कर्मचारी देखील या हिंसाचारात जखमी झाले. सर्वेक्षणासाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर आक्रमक कट्टरपंथीयांनी हल्लाबोल केला. परंतु उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थाला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही याचा निश्चय केलेले मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी या समाजकंटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण ६० जणांना कारवाई करण्यात आली. काही आरोपी हे दिल्ली आणि परराज्यांमध्ये पळून गेले होते, त्यांना सुद्धा बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.
अशातच आता १३ जानेवारी रोजी अमिर अन्सारी आणि मोहम्मद इम्रान या दोघांना मोहल्ला कोटगरर्बी येथून अटक करण्यात आली. २४ नोव्हेंबर रोजी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या टोळीमध्ये दोघांचा समावेश होता. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या शहरांमध्ये फरार झाले. आपआपल्या घरी परतल्यावर दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. संभळच्या पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समाजकंटकांची ओळख पटली असून आतापर्यंत एकूण ६० जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये ४ महिलांचा सुद्धा समावेश आहे. एकूण ८९ जणांची ओळख पटली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.