इंदूर: धार्मीक स्थळांचे पावित्र्य राखले जावे यासाठी सदर परिसरात मद्य विक्रीवर बंदी आणली जावी असा प्रस्ताव काही संतांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या समोर मांडला आहे. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्य सरकार धार्मीक स्थळांच्या हद्दीत दारूची दुकाने बंद करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.
माध्यमांशी संवाद साधताना यादव म्हणाले की अर्थसंकल्पीय वर्ष संपुष्टात येत असून धार्मीक स्थळांच्या बाबतीत आमचे सरकार धोरणांमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. धार्मीक स्थळांवर मद्य विक्रीस बंदी घालण्यात यावी या मागणीवर आम्ही गांभीर्यपूर्वक विचार करीत आहोत. अनेकांनी या बद्दलच्या तक्रारी आमच्यासमोर मांडल्या आहेत. सदर धार्मीक स्थळांचे पावित्र्य जपले जावे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी १३ जानेवारी रोजी सेवरखेडी- सिलारखेडी या प्रकल्पाचं भूमिपूजन केले. एकूण ६१४ कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून यामुळे क्षिप्रा नदी पूर्णपणे स्वच्छ होणार आहे. सेवरखेदी - सिलारखेदी प्रकल्पाच्या अंतर्गत तब्बल ६५ गावांमध्ये १८ हजार ८०० हेक्टेर क्षेत्रामध्ये जलसिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर उज्जैन जवळ नवीन नगर वसवण्याची घोषणा सुद्धा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे.
या प्रकल्पांतर्गत, सेवारखेडी येथे १.४५ घनमीटर पाणी क्षमतेचा बंधारा बांधला जाईल. यानंतर, इथून सुमारे साडेसहा किलोमीटर अंतरावरून पाईपद्वारे पावसाचे पाणी उचलले जाईल आणि उज्जैनमधील सिलारखेडी गावात बांधलेल्या तलावात गोळा केले जाईल. यासाठी तलावाची उंची वाढवून त्याची पाणी साठवण क्षमता देखील वाढवली जाईल. ज्यामुळे तलावात एकूण ५१ घनमीटर पाणी साठवता येते. यानंतर, जेव्हा क्षिप्रा नदीत पाणी कमी होईल, तेव्हा या तलावातून क्षिप्राला पाणीपुरवठा केला जाईल. याचा अर्थ असा की या नदीचे पाणी आता क्षिप्रामध्येच राहील.या परियोजनेचं काम २०२७च्या सप्टेंबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. जेणेकरून २०२८ साली होणाऱ्या सिंहस्थ मध्ये सहभागी होणाऱ्या साधू संतांना, भाविकांना शुद्ध पाणी मिळू शकेल.