मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जंगलात बांबू तोडण्याचे काम करणाऱ्या कामगारावर वाघाने हल्ला करुन त्याला ठार केल्याची घटना मंगळवार दि. १४ जानेवारी, २०२५ रोजी बल्हारशाह वनपरिक्षेत्रात घडली (tiger attack in chandrapur). कामगाराला ठार केल्यानंतर वाघ त्याच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला (tiger attack in chandrapur). तो मृतदेहाजवळून हटत नसल्याने प्रसंगी वन विभागाने त्याला भुलीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेतले. (tiger attack in chandrapur)
मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बल्हारशाह वनपरिक्षेत्रामध्ये काही बांबू तोड कामगार बांबू तोडण्याचे काम करत होते. वन विभागानेच या कामगारांना बांबू तोडण्याचे काम दिले होते. यामधील लालसिंग मडावी हे कामगार मध्यप्रदेशवरुन या कामासाठी बल्हारशाह येथे आले होते. बांबू तोडत असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला आणि त्यांना जागीच ठार केले. याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता मडावी यांच्या मृतदेहाजवळच वाघ बसून होता. या वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता वाघ वनकर्मचाऱ्यांवर धावून आला. त्यामुळे वनकर्मचारी मागे हटले. सायंकाळचे चार वाजले तरी, हा वाघ मृतदेहापासून दूर जात नव्हता. त्यामुळे अखेरीस ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकांना बोलावून या वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले.
वाघ बेशुद्ध झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात करण्यात आली. हा वाघ नर असून तो अंदाजे चार वर्षांचा आहे. यानंतर वन विभागाने मडावी यांचे शव ताब्यात घेतले आणि ते नातेवाईकांना देऊन त्यांना तात्पुरती सानुग्रह आर्थिक मदतही देण्यात आली.