राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत परळीतील सरपंचाचा नाहक बळी!

13 Jan 2025 12:46:37

Saundana
 
बीड : (Saundana Sarpanch Accident) बीडच्या केज तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहे. अशातच आता बीडमधीलच परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका सरपंचाला उडवल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्देवी घटनेत सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या भीषण अपघातात क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 
नेमकं काय घडलं?
 
परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवार दि. ११ जानेवारी रोजी रात्री सव्वा नऊच्या वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. परळी येथील औष्णिक केंद्रातील राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला उडवले. सरपंच क्षीरसागर रात्री त्यांच्या शेतातून घरी परतत होते. त्यावेळी राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात सरपंच अभिमून्य क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान टिप्पर चालकाने त्याच ठिकाणी टिप्पर सोडून पळ काढला होता. अखेर पोलिसांनी या टिप्पर चालकाला ताब्यात घेतले असून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष असेल. हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करत आहेत.
 
अपघात की घातपात?
 
या घटनेबाबत आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे. सुरेश धस म्हणाले की, "काल रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली आहे. बोगस आणि अवैध राखेची लूट परळी भागात चालू आहे, याचा करिश्मा बघा. रात्री झालेली घटना घातपात की अपघात याचा शोध अजून लागायचा आहे. परळी विभागाची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा राखेचे टीप्पर बंद झालेले नाहीत" या अवैध व्यवसायांना परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0