प्रयागनगरीत ‘महाकुंभ’ला आजपासून सुरुवात

13 Jan 2025 11:54:09
Prayagraj Mahakumbh

मुंबई : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज ( Prayagraj Mahakumbh ) येथे आजपासून ‘महाकुंभ’ला सुरुवात होत आहे. दि. १३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘महाकुंभ’ होत आहे. यासाठी जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. सुमारे ४० कोटी भाविक प्रयागराजला पोहोचण्याची शक्यता आहे. आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले अमृत स्नान होत असून दि. १४ जानेवारी मकर संक्रांती, दि. २९ जानेवारी मौनी अमावस्या, दि. ३ फेब्रुवारी बसंत पंचमी, दि. १२ फेब्रुवारी माघी पौर्णिमा, दि. २६ फेब्रुवारी महाशिवरात्री या अमृत स्नानाच्या एकूण सहा तारखा आहेत.

सर्व १३ आखाडे संगमात स्नान करणार असून त्यासाठीची व्यवस्थाही पूर्ण झाली आहे. प्रत्येक आखाड्यासाठी ४० मिनिटांची मुदत देण्यात आली आहे. घाट स्वच्छ करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आंघोळ करणार्‍या लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीसही तैनात आहेत. ‘महाकुंभ’त नागा साधू, अघोरी साधू, ऋषिमुनी, वैष्णव साधू, शैव साधू, भक्ती साधू, उदासी साधू असे एकूण सात विविध प्रकारचे साधू येत असतात. येणार्‍या पाहुण्यांचे आणि साधू-महंतांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण प्रयागराज नगरी सजली आहे. महाकुंभ जगाला नवी दिशा देईल, असा अनेकांना विश्वास आहे.

Powered By Sangraha 9.0