मुंबई : खासगी गृहनिर्माण क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारी आघाडीची संस्था क्रेडाई - एमसीएच कडून ३२ वा रियल इस्टेट एक्सपो १७ ते १९ जानेवारी दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कव्हेंशन सेंटर येथे आयोजित केला जाणार आहे. या एक्सपोची माहीती देण्यासाठी मेकर्स भवन मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची संकल्पना ' द मॉल ऑफ होम्स' ही असणार आहे. या एक्सपोमध्ये महीलांनी स्वत:चे घर खरेदी करावे यासाठी उत्तेजन देण्यासाठी खास ऑफर असणार आहे. या एक्सपो मध्ये यंदा १००हून अधिक विकासक ५०० प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वप्नातले घर त्याला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होईल असे मत आयोजकांनी मांडले. यात खरेदीदारांना वित्तपुरवठ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी २५ हून अधिक वित्तीय संस्था सहभागी होणार आहेत.
या एक्सपोमधील पहीला दिवशी घर खरेदी विक्रीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या रियल इस्टेट ब्रोकर्सचा सत्कार केला जाणार आहे. दुसरा दिवस सुपर सॅटर्डे म्हणजे यादिवशी घर बुकिंग करणाऱ्या व्यक्तींना खास सवलती मिळणार आहेत. तिसरा दिवस नाविन्यपूर्ण असणार असून तो पिंक सनडे म्हणुन साजरा होणार आहे. या दिवशी घर बुक करणाऱ्या महिलांना २ लाख पर्यंतची अतिरिक्त सवलत मिळणार आहे. यामध्ये काही अटी लागु असणार आहेत जसे की या घर खरेदी करणाऱ्या महीला पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या असाव्यात. या विशेष योजनेस स्त्री - आवास योजना असे नाव देण्यात आले आहे.
या एक्सपोबद्दल बोलताना क्रेडाई - एमसीएचचे अध्यक्ष डॉमनिक रोमेल म्हणाले " या वर्षीचा एक्सपो घर खरेदी विक्री मध्ये एक मैलाचा दगड ठरेल. यामध्ये १० मिनीटांत तुमचे घर बुक करा ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे घर खरेदीतील अडचणी दूर होऊन लोकांना आपल्या घराचे स्वप्न लवकर साकार करण्याची संधी मिळणार आहे."
या एक्सपोचे संयोजक निकुंज संघवी म्हणाले " हा एक्सपो ही घर खरेदीदारांसाठी भविष्यातील संधी निर्माण करणारी एक चळवळ आहे. यामधून नवीन उद्योजकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना एकाच मंचावर आणले जाईल. यातुन नवीन विचारांची देवाणघेवाणीसाठी एक मंच तयार होईल आणि हाच या एक्सपोचा मुख्य उद्देश आहे."
या एक्सोमध्ये मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील मोठे बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. ज्यात रुस्तमजी, रोमेल ग्रुप, कल्पतरू लिमिटेड, अदानी रिअॅल्टी यांसारखे मोठे व्यावसायिक सहभागी होणार आहेत. तर बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, गोदरेज हाऊसिंग फायनान्स यांसारख्या आघाडीच्या खासगी आणि सरकारी क्षेत्रातील बँका सहभागी होणार आहेत.