शिर्डी : “महाराष्ट्राच्या महाविजयानंतर आपण पहिल्यांदा एकत्र आलो आहेत. कार्यकर्त्यांनी किती मोठे काम केले, याची तुम्हाला कल्पना नाही. ( BJP ) देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले. अनेक कार्यकर्ते आमदार आणि मंत्री झाले. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचे राजकारण सुरू केले. त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला, २०१९ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडले होते. दगाफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते. त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली,” अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
भाजपचे शिर्डी येथे रविवार, दि. १२ जानेवारी रोजी एक दिवसीय अधिवेशन संपन्न झाले. यावेळी, केंद्रीय मंत्री अमित शाह बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “गेल्या वर्षीच्या निवडणुकीत घराणेशाही आणि विश्वासघाताचे राजकारण नाकारून महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादीचे (एसपी) प्रमुख पवार आणि शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवली. दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रातील काँग्रेस आणि मित्रपक्षांमधील मतभेदांचा हवाला देत शाह म्हणाले की, “विरोधी ‘इंडी’ ब्लॉकची घसरण सुरू झाली आहे.”
पवार आणि ठाकरेंना जागा दाखवली
“शरद पवार यांनी १९७८ मध्ये महाराष्ट्रात ’डगा-फटका’ (विश्वासघात आणि विश्वासघात) राजकारण सुरू केले, जे या निवडणुकीत लोकांनी नाकारले. तसेच घराणेशाहीचे राजकारण आणि उद्धव ठाकरे यांचा विश्वासघातही फेटाळला. २०२४च्या निवडणुकीत लोकांनी पवार आणि उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली,” असे शहा यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळेल
“महाराष्ट्रातील भाजपच्या विजयाचे दीर्घकालीन परिणाम होतील,” असे नमूद करून शाह म्हणाले की, “ऐतिहासिक विजयाने भारतीय आघाडीच्या आत्मविश्वासाला तडा गेला आहे. पुढील महिन्यात होणार्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होईल,” असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल
“ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली, हे विधानसभेला आपण पाहिले,” असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. “महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो महाविजय प्राप्त झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांना माझा साष्टांग दंडवत. कारण जनतेमुळे हा महाविजय मिळाला. आपल्या या लढाईमध्ये २४ तास आपल्याबरोबर अमित शाह होते. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर कार्यकर्त्यांना लक्षात येत नव्हते की आपले काय चुकले. मात्र, अशा परिस्थितीत अमित शाह यांनी विविध ठिकाणी मेळावे घेत आपल्याला मार्गदर्शन केले, कार्यकर्त्यांच्या मनात ऊर्जा निर्माण केली. त्यानंतर भाजपने महाविजय मिळवला. आपण शिर्डीत हे महाविजय अधिवेशन घेत आहोत, याचा मला आनंद आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला स्थिर सरकार दिले
‘’१९७८ ते २०२४ महाराष्ट्रात अस्थिरतेची स्थिती होती. अस्थितरता सोडून स्थिर राष्ट्र बनवण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. लोकसभेनंतर आमचा विजय होईल, असे विरोधकांचा स्वप्न होते. पण त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. काही निवडणुका अशा असतात की, त्या देशाचे राजकारण बदलतात. महाराष्ट्राचे शिल्पकार भारताचे जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत,” असेही अमित शाह यांनी सांगितले.
श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपत महत्त्वाचा
“साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भाजपत महत्त्वाचा आहे. ‘राष्ट्र प्रथम’ म्हणजे श्रद्धा आणि नंतर सबुरी म्हणजे आपण. हा मंत्र आपण सर्वजण पाळत असतो. आपल्याला माहिती आहे की, ज्यांना हा मंत्र समजला, ते सर्व यशस्वी झाले. पण श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र ज्यांना समजला नाही, त्यांची हालत काय झाली, हे आपण विधानसभेच्या निवडणुकीत पाहिले,” असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली.
विधानसभेला भाजप मेरिटमध्ये उत्तीर्ण
“महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला एक नाही, तर तीन वेळा भाजपला १०० पेक्षा जास्त जागा दिल्या. ३० वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात १०० पेक्षा जास्त जागा मिळवणारा आपला पक्ष आहे. आपण पाहतो की, जसे ‘जी-२०’ असते, ’जी-७’ असते, तसे भाजपचे ‘जी-६’ तयार झाले, म्हणजे जे सलग तीन वेळा जिंकले त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगढ आणि हरियाणाबरोबर आता महाराष्ट्रदेखील जोडलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी १७ जागा आपल्या निवडून आल्या. जेमतेम ३५ टक्के गुण घेऊन आपण काठावर उत्तीर्ण झालो होतो. मात्र, त्यानंतर आपण विधानसभेला २८८ पैकी २३७ जागा आपण जिंकल्या आणि ८२ टक्के गुण मिळवले. भाजपने तर ८९ टक्के गुण मिळवले आणि आपला पक्ष मेरिटमध्ये उत्तीर्ण झाला,” असही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.