प्रयागराज : पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रयागरामध्ये आयोजित महाकुंभमेळा (Maha Kumbh Mela) दि : १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाला. सकाळपासून लाखोंच्या संख्येने भाविकांचा जनसमुदाय लोटला आहे. प्रयागराजमधील विविध घाटांवर श्रद्धाळू भाविक स्नान करण्यास आपली हजेरी लावत आहेत. या उत्सवामध्ये भारतीयांसोबत परदेशी भाविकांचाही समावेश आहे. कुंभमेळ्याला काहींनी मोक्षप्राप्तीची उपमा दिली आहे. श्रद्धेचा महापूर पाहून परदेशी नागरिक थक्क झाले असून 'मेरा भारत महान'चा नारा परदेशी नागरिकांनी दिला आहे.
सकाळी ९ वाजेदरम्यान ६० लाखांहून अधिक भाविकांनी स्नान केले. जगभरातून आलेले लोकही मोठ्या संख्येने महाकुंभात सामिल झाले आहेत. यावेळी स्नान केल्यानंतर एका परदेशी रशियन युवतीने भारतात सुरू असलेल्या कुंभमेळ्याचा उदोउदो केला आहे. 'मेरा भारत महान' आहे. मी रशियाहून आली आहे. रोजगारासाठी मी युरोपात स्थायिक आहे. पहिल्यांदाच या महाकुंभमेळ्याला सहभागी झाली असल्याचे तिने सांगितले. नंतर ती पुढे म्हणाली की, भारत देश इतर देशांहून कमी नाही. आम्ही सर्व लोक उत्साही आहोत आणि खरा भारत या कुंभमेळ्यातच दिसत आहे. मी माझ्या भावना शब्दात सांगू शकत नाही, असे रशियन भक्ताने माध्यमाशी बोलत असताना भावना व्यक्त केल्या.
ब्राझीलमधील एका भक्ताने सांगितले की, मी योगा करतो आणि मी मोक्षाच्या शोधार्थ आहे. भारत ही जगाची धार्मिक राजधानी आहे. मी पूर्वी वाराणसीमध्ये गेले होते आणि आता प्रयागराजमध्ये आलो आहे. इथले पाणी जरी थंड असले तरी भक्तीमय वातावरणात मन मात्र उबदार झाले आहे. त्यानंतर पुढे त्याने 'जय श्री राम'चा नारा लगावला.
इटलीतील भाविकाने प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित करताना केलेल्या आयोजनाचे कौतुक केले. चांगली व्यवस्था नसती तर आयोजन करणे अशक्य झाले असते, असे तो म्हणाला. तसेच यावेळी एका द. आफ्रिकन नागरिकाने भगवे कापड परिधान केले होते. आम्ही सनातनी आहोत म्हणून आम्ही कपाळाला टीळा लावतो, असे तो नागरिक म्हणाला.
दरम्यान, प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस प्रशासन आणि रेल्वेसह विविध विभागातील कर्मचारी आपली चोख भूमिका बजावत आहेत. प्रयागराज महाकुंभावर पोलीस नियंत्रण कक्षाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी प्रयागराजमध्ये एकूण १० हजार बसेस आणि ४० प्रशासन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.