उद्या, दि. १२ जानेवारी. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपला देश हा तर जगातील सर्वाधिक युवा संख्या असलेला देश. युवा ही देशाची खरी संपत्ती मानली जाते. वर्तमान सुधारण्याची आणि भविष्य घडवण्याची ताकद या युवांमध्ये असते. आपल्या देशातील युवांनी प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेलेच आहे. आज साहित्य क्षेत्रही याला अपवाद नाही. आपली अभिजात आणि समृद्ध असलेली मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे आणि पुढे नेण्याचे काम अनेक युवा साहित्यिक करत आहेत. या युवा साहित्यिकांना मराठी भाषेचे युवा शिलेदार म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. तेव्हा ‘राष्ट्रीय युवा दिना’च्या निमित्ताने अशाच दोन युवा साहित्यिकांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या भावना...
...अन् शाळेपासून सुरू झालेली कविता साहित्य संमेलनात पोहोचली
माझी कविता लिहिण्याची सुरुवात शाळेपासून झाली. शाळेत असताना शिक्षक जेव्हा कविता शिकवायचे, तेव्हा त्या कविता खूप आवडायच्या. आपणही असेच काहीतरी लिहावे, असे त्यावेळी खूप वाटायचे. मग शाळेत साजर्या होणार्या जयंती, पुण्यतिथी आणि इतर शालेय कार्यक्रमांच्या निमित्ताने मी कविता लिहू लागलो. चौथी-पाचवीपासून हळूहळू शब्दांची जुळवाजुळव सुरू झाली आणि मग नंतर नववी-दहावीपासून त्या कविता आकार घेऊ लागल्या. ‘गुलमोहराचं कुंकू’ हा माझा पहिला काव्यसंग्रह २०२१ साली ‘चपराक प्रकाशना’तर्फे प्रकाशित करण्यात आला. २०२२ साली ‘गुलमोहराचं कुंकू’ या माझ्या पुस्तकाची ‘युवा साहित्य अकादमी’साठी निवडल्या गेलेल्या अंतिम पाच पुस्तकांमध्ये निवड झाली होती. लिखाणासोबतच कविता सादरीकरणाचे कार्यक्रमही मी करत असतो. ‘नातवांच्या कविता’ हा कार्यक्रम आम्ही सुरुवातीच्या काळात केलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवींसोबत मी कार्यक्रमांमध्ये कविता सादर केल्या आहेत. ‘कविता माणसांच्या, कविता नात्यांच्या’ हा कार्यक्रम महाराष्ट्रभर केलेला आहे. शाळेपासून लिहायला सुरुवात केलेली माझी कविता २०२१ साली अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचली. त्यावर्षी नाशिकमध्ये झालेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मी माझी कविता सादर केली. त्या संमेलनात ‘निमंत्रित कवी’ म्हणून माझा सहभाग होता. सध्या माझे बालकवितासंग्रह आणि एका गझलसंग्रहाचे लिखाण सुरू आहे. मराठीमध्ये जे उत्तमोत्तम साहित्य आहे, त्याचे वाचन झाले पाहिजे, त्यावर चिंतन-मनन केले गेले पाहिजे. मराठीमध्ये अनुवाद झालेले इतर भाषांमधील जे साहित्य आहे, तेही आपण वाचले पाहिजे. अजून अशाच बर्याच गोष्टी आहेत, ज्या साहित्यात आलेल्या नाहीत. ग्रामीण जीवनाशी जोडलेल्या तर अशा अनेक शब्द आणि गोष्टी आहेत, ज्या मराठी साहित्यात यायला हव्यात. युवा साहित्यिकांनी ते काम केले पाहिजे, असे राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते.
प्रशांत केंदळे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी कवी
अभिव्यक्तीतूनच चांगली साहित्यनिर्मिती शक्य
लहानपणापासून वाचनाची आवड होती. गावच्या वाचनालयात जी काही वर्तमानपत्रे आणि पुस्तके होती, ती वाचण्याची सवय होती. घरी टीव्ही किंवा रेडिओ असे कोणतेही मनोरंजनाचे साधन नसल्यामुळे पुस्तकांकडे आणि वाचनाकडे ओढा वाढत राहिला. त्या वाचनातून मग लिखाणाची आवड लागली. ‘कर्णाच्या मनातलं’ हा माझा पहिला कवितासंग्रह जो पूर्णपणे कर्णाच्या जीवनावर आधारित होता, तो २०१८ साली प्रकाशित झाला. त्यानंतर २०२१ साली ‘काळजात लेण्या कोरताना’ हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर २०२२ साली ‘उसवण’ कादंबरी प्रकाशित झाली. ‘रेडी-मेड’ कपडे बाजारात मोठ्या प्रमाणात यायला लागल्यामुळे पारंपरिक शिवणकाम करणार्या कामगारांवर कशी वाईट परिस्थिती ओढावली आहे, त्यांच्यावर कशी उपासमारीची वेळ आलेली आहे, याचे चित्रण मी या ‘उसवण’ या कादंबरीत मांडलेले आहे. या कादंबरीला २०२४ साली ‘युवा साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. माझे दोन वर्षांपासून एका कवितासंग्रहावर काम सुरू होते. तो कवितासंग्रह कदाचित यावर्षी प्रकाशित होईल. सोबतच एका कादंबरीवरसुद्धा काम सुरू आहे. आजच्या काळात व्यक्त होणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. मोबाईलमुळे जग जवळ आलेले आहे, असे आपण म्हणतो. पण, माणसे एकमेकांपासून दूर गेलेली आहेत. आज संपर्काची इतकी माध्यमे उपलब्ध असूनसुद्धा माणसे एकमेकांशी संवाद साधत नाहीत. आताच्या काळात माणसे इतकी व्यस्त झाली आहेत की, एखादा माणूस निराश असेल, दुःखी असेल आणि त्याला जर कोणाजवळ व्यक्त व्हायचे असेल, तर कोणालाही वेळ नसल्यामुळे त्याला व्यक्त होता येत नाही. माणूस आनंदी असला आणि दुःखी असला, तरी त्याला सोबतीची गरज असते, जी आताच्या काळात मिळत नाही. अशा वेळी माणसाने कागदाची सोबत करावी आणि लिहून व्यक्त व्हावे. पुस्तके ही माणसाचे सगळ्यात जवळचे मित्र असतात. त्यामुळे माणसाने पुस्तकांशी मैत्री करावी. माणसाने व्यक्त होणे खूप महत्त्वाचे आहे. या व्यक्त होण्यातूनच चांगली साहित्यनिर्मिती होऊ शकते.
देविदास सौदागर, युवा साहित्य अकादमी पुरस्कार, २०२४
दिपाली कानसे