जेमतेम परिस्थिती व कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्द, धाडस आणि मेहनतीच्या बळावर यशस्वी युवा उद्योजक झालेल्या प्रणवकुमार ब्रिजकिशोर अहिरे यांच्याविषयी...
प्रणवकुमार ब्रिजकिशोर अहिरे यांचा जन्म मालेगावचा. मूळ सटाण्यातील असलेले प्रणवकुमार यांच्या वडिलांचा शेती हा व्यवसाय, तर आई गृहिणी. प्राथमिक शिक्षण सटाण्यातीलच अभिनव बाल विकास मंदिरमध्ये त्यांनी पूर्ण केले. कोरडवाहू शेती असल्याने, परिस्थिती तशी जेमतेमच. लोकनेते पंडित धर्मा पाटील विद्यालयातून त्यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इयत्ता आठवी, नववीत तायक्वांदो आणि बॉक्सिंगमध्ये त्यांनी, राज्यस्तरापर्यंत मजल मारली. याचदरम्यान त्यांनी गावात कराटेचे क्लासेसही घेतले. यंत्रांविषयी आवड असल्याने, इयत्ता सातवीपासूनच त्यांनी मेकॅनिकल डिप्लोमा करण्याचे प्रणवकुमार यांनी ठरवले.
इयत्ता दहावीनंतर त्यांनी वाडिया कॉलेजला प्रवेश घेतला. खेड्यातून थेट शहरात जाऊनही, प्रणवकुमार यांनी तेथील परिस्थितीशी जुळवून घेतले. कॉलेजला असतानाही ते असोसिएशनच्या कराटे सामने असल्यास, सटाण्यात येत असत. मेकॅनिकल डिप्लोमा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर, पुढे नोकरी न करण्याचा त्यांनी निश्चय केला. प्लास्टिक आणि इंजेक्शन मोल्डिंगमध्ये काम करण्याचे त्यांनी ठरवले. मात्र, तितका खर्च पेलवत नसल्याने तो विषय बाजूला पडला. शेती होतीच, त्यात काही उद्योग-व्यवसाय करता येईल का? याचा विचार झाला. मात्र, शाकाहारी असल्याने, शेळीपालनाच्या व्यवसायाला घरातून विरोध झाला. सहा वर्षांपूर्वी गांडूळ खताला फारशी स्पर्धा नव्हती, त्यामुळे ‘गांडूळ खत प्रकल्प’ उभारण्याचा निर्णय घेतला. एप्रिल २०१८ साली गांडूळ खत प्रकल्पाचा शुभारंभ झाला. आईच्या ‘निर्मला’ या नावावरून, ‘निर्मल नॅचरल्स’ नावाने प्रकल्प सुरू केला गेला. परंतु, अवघ्या दीड महिन्यातच वादळामुळे प्रकल्पाचे शेड उडाले. त्यानंतर दुसर्यांदाही वादळी पावसामुळे शेड उडून गेले आणि गांडूळही मृत झाले. सगळे काही उद्ध्वस्त झाले होते. अशात जोरदार पाऊस आल्यास खत वाचविण्यासाठी खाली ताडपत्री घेऊन, प्रणवकुमार आणि कुटुंबीय उभे राहत होते. पुढे खत प्रकल्पाचे पक्के बांधकाम करून घेतले. अशावेळी पैसे उभे करण्यासाठी , घरातील दागिनेही गहाण ठेवावे लागले. सुरूवातीला बारा बेडपासून सुरूवात केली. त्यात १६, २० आणि ३० अशी वाढ होत गेली. पुन्हा नवीन शेड बांधले आणि त्यातही गांडूळ खत प्रकल्प सुरू झाला.
पहिले ग्राहक येण्यासाठी प्रणवकुमार यांना तब्बल आठ महिने वाट पाहावी लागली. तत्पूर्वी घरोघरी जाऊन त्यांनी दहा रूपयाचे गांडूळ खताचे पॅकेट विकले. परंतु, त्यालाही फार चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. लोकांना व्हिझिटींग कार्ड जरी दिले, तरी काहीजण ते घेत नव्हते. रस्त्याच्या कडेला स्टॉल लावला तर चहा पावडर समजून लोक पाहण्यासाठी येत असत, मात्र विक्री काही झाली नाही. हा स्वतःचा अपमान समजून प्रणवकुमार यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांना गांडूळखताचे महत्त्व समजावून, विक्री करण्यास सुरूवात झाली. नर्सरीमालकांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. खताचे योग्य सूत्र आणि त्यात आणखी काही गोष्टी समाविष्ट केल्या. त्यामुळे दुसर्या दिवशी त्याचा परिणाम दिसून येत होता. याच दरम्यान, ‘बीएससी अॅग्री’चे शिक्षणही त्यांनी मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले. पुढे गोशाळा सुरू केली. त्यात एका नंदीचा आणि गाईचा मृत्यू झाला. याची कारणे प्रणवकुमार यांनी शोधली. सुरूवातीला गीर गाईंचे दूध विकणे शक्य झाले नाही. मग गीर गाईचे तूप विकले. त्यानंतर शेणापासून मूर्त्या, धूप, दिवे अशा गोष्टींची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. शून्य रसायनांचा वापर करून, यांची निर्मिती केली जाते. शेणाच्या मूर्त्यांमध्ये आदियोगी, प्रभू श्रीराम, गौतम बुद्ध, श्रीकृष्ण, स्वस्तिक इ. समावेश आहे. मूर्त्यांची व अन्य वस्तूंची विक्री हवनकुंड नावाने केली जाते. सर्वप्रथम गोवर्यांची विक्रीदेखील केली जात होती.सध्या गोशाळेत सात गाई आणि सात वासरू आहेत. याचबरोबर मार्केटिंगवर शून्य रूपये खर्चूनही ‘निर्मल नॅचरल्स’ वर्षाकाठी, २५० टन गांडूळ खताची निर्मिती करते. प्रणवकुमार यांच्या माध्यमातून अनेक जणांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळत आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षाच्या डिसेंबरपर्यंत खताच्या सर्व बुकिंग फुल्ल झाल्या आहेत. गांडूळ खतांमुळे कांद्याच्या बुंध्याखालील मुळी कुजणे थांबले, कांद्याची टिकवण क्षमता आणि पांढरी मुळी वाढली. एकरी उत्पन्नही वाढले आणि इतर रासायनिक खतांवरील खर्च ५० टक्क्यांनी कमी झाला. डाळिंबावरील अनेक रोगांवरही खत प्रभावी ठरते आहे.
गांडूळ हातात घ्यायलाही आवडत नव्हते, त्याविषयी काही माहिती नव्हती, नोकरी करण्याचे ठरवले नव्हते. मात्र, आता गांडूळ खत प्रकल्पामुळे यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतची मजल प्रणवकुमार यांना मारता आली. आजकाल रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात सेंद्रीय शेतीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यात शेणाच्या शोभेच्या वस्तू बनविण्याचा विचार असल्याचे प्रणवकुमार सांगतात. जेमतेम परिस्थिती व कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्द, धाडस आणि मेहनतीच्या बळावर यशस्वी उद्योजकापर्यंतचा प्रवास केलेल्या प्रणवकुमार यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
७०५८५८९७६७