सुवर्ण भारताचे शिल्पकार! - प्रजासत्ताक दिनानिम्मित १० हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रण

    11-Jan-2025
Total Views |

rpd
 
नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी आपला देश ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या निमित्ताने या कार्यक्रमाला १० हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. सुर्वण भारताच्या निर्मितीसाठी कार्यरत असणारे, विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. सरकारी योजनांचा वापर करून आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नागरिकांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने ग्रामीण भागातील पंचायतींमध्ये राष्ट्रीय स्तरावर एक स्पर्धा जाहीर केली होती. ज्या गावांनी निवडक सरकारी उपक्रमांमध्ये लक्ष्य गाठले, त्या गावांच्या सरपंचांना आमंत्रित करण्यात आले आहे. कमीत कमी सहा प्रमुख योजनांमध्ये लक्ष्य साध्य करणाऱ्या पंचायतींची विशेष पाहुणे म्हणून निवड करण्यात आली आहे. बचत गटांच्या माध्यमातून उत्पन्न आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात भारतातील लोक महत्वाची कामगिरी बजावत आहे. अन्न, पोषण, आरोग्य, पाणी स्वच्छता आणि स्वच्छता, पंचायती राज संस्था-समुदाय आधारित संघटना,या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसहायता गटांना आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान जनमन मिशनमध्ये सहभागी झालेले सदस्य, आदिवासी कारागीर/वन धन विकास योजनेचे सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ उपक्रम, आशा कार्यकर्ता यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आपत्ती निवारण कर्मचारी, पाणी समिती, जल योद्धे, वन आणि वन्यजीव संवर्धन स्वयंसेवक ज्यांनी आपत्ती निवारण आणि पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे त्यांना प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.पंतप्रधान सूर्य घर योजना आणि पंतप्रधान कुसुम अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि अक्षय ऊर्जेच्या वापरात योगदान देणाऱ्या शेतकरी आणि कुटुंबांनाही पहिल्यांदाच आमंत्रित करण्यात आले आहे.पॅरा-ऑलिंपिक पथकातील सदस्य, बुद्धिबळ ऑलिंपियाड पदक विजेते, ब्रिज वर्ल्ड गेम्स रौप्य पदक विजेते आणि स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेते यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नवोन्मेष आणि उद्योजकीय वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी, पेटंट धारक आणि स्टार्ट-अप्सच्या प्रभारींना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले जात आहे. अखिल भारतीय शालेय बँड स्पर्धा आणि वीर गाथा स्पर्धेतील विजेते देशभक्तीच्या भावनेने भारलेले शालेय विद्यार्थी देखील प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभांव्यतिरिक्त, विशेष पाहुणे राष्ट्रीय युद्ध स्मारक, पंतप्रधान संग्रहालय आणि दिल्लीतील इतर महत्त्वाच्या ठिकाणांना देखील भेट देतील.