देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही - डॉ.उदय जोशी.

11 Jan 2025 19:03:32


sahkar

मुंबई : देशाच्या सर्वांगीण विकासात सहकाराचे महत्व खूप मोठे आहे. समाजातील सर्वच थरांतील प्रत्येकाचा विकास साधायचा असेल तर सहकारा शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांनी मांडले. सहकार भारती वर्धापन दिनानिमित्त सहकार भारती नवी मुंबई जिल्हा व पनवेल महानगर आयोजित संवाद सहकाराचा ही कार्यशाळा संपन्न झाली. सहकारी गृहनिर्माण संस्था, त्यांना भेडसावणारे प्रश्न या विषयांवर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांनी भूषवले. या शिवाय सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार भारती महाराष्ट्र महामंत्री विवेक जुगाडे , हावरे ग्रुपचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी सिडकोचे निबंधक सहकारी संस्था प्रताप पाटील, नवी मुंबई सहकार भारती अध्यक्ष प्रमोद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबईतील नेरूळ येथे आगरी कोळी भवन येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्रतील गृहनिर्माण संस्थांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत जसे की पुनर्विकास, डीम्ड कन्व्हेयन्स, गृहनिर्माण संस्थांचे नियोजन असे प्रश्न भेडसावत आहेत. त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा जरुरी आहेत असे मत सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी यांनी मांडले. सहकारी गृहनिर्माण संस्थांनी काम करत असताना आपल्याला भेडसवणाऱ्या समस्यांवर उत्तर शोधणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यावरणीय बदल. हा विषय खूप महत्वाचा आहे. त्यावर उत्तर शोधणे आपल्या भविष्यासाठी गरजेचे आहे. असे मत सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी मांडले. आपल्या जीवनसाठी नवी त्रिसूत्री बाणणे गरजेचे आहे. ती त्रिसूत्री म्हणजे अन्न, वस्त्र आणि विचार. विचार लोकांपर्यंत पोहोचवणे आजच्या काळात गरजेचे आहे. जगात जर चांगले व्यक्ती घडवायचे असतील तर जगातील सज्जन लोकांनी आपली निष्क्रियता सोडून कार्य करायला सुरुवात केली पाहिजे. गृहनिर्माण संस्था या समाजाचे छोटे प्रतीक आहे. त्यामुळे समाजाच्या एकात्मिक विकासाची संधी या गृहनिर्माण संस्था उपलब्ध करून देतात. असे विचार हावरे ग्रुपचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मांडले.

सहकार भारती ही सहकार क्षेत्रात काम करणारी भारतातील एक महत्वाची संस्था आहे. १९७८ पासून ते आता पर्यंत सहकार क्षेत्राच्या विकासासाठी ही संस्था अव्याहत पणे काम करत आहे. या कार्यशाळेत नवी मुंबई हौ. फेडरेशनचे भास्कर म्हात्रे, तानाजी कवडे सह निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र हौ. फेडरेशनचे अॅड. श्रीप्रसाद परब, अॅड. शिल्पा शिनगारे, अॅड. उदयजी वारुंजीकर या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत गृहनिर्माण संस्थांच्या कायदेशीर बाबी, दैनंदिन कामकाज, लेखा परीक्षण, हस्तांतरण, पुनर्विकास अशा महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले गेले. या कार्यक्रमाच्यास्थळी नवी मुंबई सहकार बचतगट प्रकोष्ठ प्रमुख जया अलिमचंदानी यांच्या माध्यमातून बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

Powered By Sangraha 9.0