जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील मैलाचा दगड

    11-Jan-2025
Total Views |
Genome Sequensing Data

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा हजार भारतीयांचा जीनोम सिक्वेसिंग डेटा जाहीर करण्यात आला आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील ही फार मोठी घडामोड असल्याचे मानले जाते. भारतीयांच्या जनुकीय विविधतेचे प्रतिनिधित्व करणारा हा जीनोम इंडिया डेटा आता संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा हजार भारतीय नागरिकांचा, जीनोम सिक्वेंसिंग डेटा जाहीर केला. जैवतंत्रज्ञान संशोधनाच्या क्षेत्रातील हा ‘मैलाचा दगड’ असल्याचे मानले जाते. देशातील जनुकीय विविधतेचे प्रतिनिधित्व करणारा जीनोम इंडिया डेटा,‘इंडियन बायोलॉजिकल डेटा’ सेंटरमधील संशोधकांना उपलब्ध होणार आहे. हा राष्ट्रीय डेटाबेस अनुवांशिक आणि संसर्गजन्य रोगांच्या उपचारांमध्ये प्रगती सुलभ करेल, नवीन औषधे आणि अचूक वैद्यकीय तंत्रांच्या विकासास चालना देईल आणि विविध समुदायांच्या जीवनशैली आणि सवयींमध्ये संशोधन करण्यास सक्षम करेल, असे मानले जाते. त्यासाठीच जीनोम म्हणजे काय? हे समजून घेणे गरजेचे ठरते. एखाद्या सजीवातील डीएनए अनुक्रमांचा संपूर्ण संच आणि त्या सजीवाच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सूचना या जीनोममध्ये असतात. यात भ्रूणोत्पत्ती, वाढ, पर्यावरणास प्रतिसाद देणे आणि रोगापासून बरे होणे, यांचाही समावेश आहे. जीनोम इंडियाचे प्राथमिक उद्दिष्ट भारताच्या लोकसंख्येसाठी, अनुवांशिक भिन्नतेची एक व्यापक सूची तयार करणे हे असून, ते भारतातील विविधतेला अधिक चांगल्याप्रकारे उपयोगी पडेल. जानेवारी २०२० साली ही योजना सुरू करण्यात आली आहे.

दहा हजार भारतीयांचे जीनोम सिक्वेन्सिंग डेटाचे प्रकाशन, भारताच्या जैवतंत्रज्ञान संशोधन क्षमतांमध्ये आणि सार्वजनिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्याच्या क्षमतेमध्ये, एक मैलाचा दगड ठरली आहे. ‘जीनोम इंडिया’ नावाचा हा उपक्रम, देशाच्या विशाल तसेच प्रदेशानुसार, विषम लोकसंख्येतील अनुवांशिक विविधता समजून घेण्यासाठी, एक मौल्यवान संसाधन प्रदान करणारा ठरेल, असे म्हणता येते. या प्रकल्पाचे महत्त्व अनेक प्रमुख घटकांवरून लक्षात येते. भारताची लोकसंख्या ही जगातील सर्वात मोठी असून, यात अनुवांशिक विविधताही आहे. भारताचा समृद्ध इतिहास आणि हजारो वर्षांच्या प्राचीन परंपराचा वारसा सांगणार्‍या उत्पत्तीचे प्रतिबिंब यात दिसून येते. ही विविधता, संशोधकांसाठी आव्हाने आणि संधी दोन्हीही प्रदान करणारी आहे. अधिक चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी तसेच, प्रभावी आणि लक्ष्यित रोग-विशिष्ट उपचार विकसित करण्यासाठी, ही अनुवांशिक समजून घेणे अत्यंत आवश्यक असेच.

संशोधनाला चालना देण्यासाठी या डेटाची उपलब्धता, ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण भारतातील तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधकांना डेटा उपलब्ध होणार आहे. या डेटाची उपयुक्तता अतिशय मौल्यवान अशीच आहे. वैद्यकशास्त्रात, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि विविध कर्करोग यासारख्या भारतातील प्रचलित आजारांचा अनुवांशिक आधार समजून घेण्यासाठी, हा डेटा मोलाची भूमिका बजावेल, असे म्हणता येते. हे ज्ञान वैयक्तिकृत औषध पद्धतींच्या विकासाचा मार्ग मोकळे करणार आहे. व्यक्तीच्या अनुवांशिकतेनुसार उपचार केले जाणे, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याशिवाय, जीनोमिक डेटाचे विश्लेषण करून, संशोधक कमी दुष्परिणामांसह अधिक प्रभावी औषधे विकसित करू शकतात. औषधांव्यतिरिक्त, जीनोम इंडिया प्रकल्प मानवी उत्क्रांती आणि त्यांचे स्थलांतर याबाबतही व्यापक संशोधन करण्याची संधी प्रदान करणार आहे. मानवी स्थलांतराचा जो इतिहास आज सांगितला जातो, त्याची तपासणी करणे याद्वारे शक्य होणार आहे. मानववंशशास्त्रीय आणि ऐतिहासिक संशोधनासाठी तो मौल्यवान माहिती प्रदान करणार आहे.

भारतीय जनुकीय डेटा भविष्यातील महामारींशी लढण्यास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारताच्या लोकसंख्येतील जैवविविधता अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय जनुकांचे विविधता असलेल्या माहितीच्या आधारे, विविध भागातील सामान्य रोगप्रतिकारक क्षमता आणि आनुवंशिकरित्या संवेदनशीलतेचे स्पष्ट चित्र आखता येईल. यामुळे साथीचे रोग आणि अन्य रोगजनकांच्या महामारीसाठी प्रभावी उपचार पद्धती आखता येईल. रोगांचा प्रारंभ व प्रसार समजून घेण्यासाठी ,जनुकीय विश्लेषण अत्यंत आवश्यक आहेच. महामारी आल्यास, एका विषाणूच्या विकासाचे आणि प्रसाराचे ट्रॅकिंग करण्यासाठीही याचा आधार घेतला जाऊ शकतो. विशेषतः म्युटेटेड प्रकारांची ओळख पटवण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे.
जनुकांच्या डेटाबेसमुळे महामारीची आव्हाने ओळखण्यात, त्यावर उपाययोजना करण्यामध्ये कार्यवाही करण्यास मदत होते. त्याचा वापर करून, सामान्यांची आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि सरकारी धोरणे अधिक प्रभावी बनवणेही शक्य होणार आहे.

भारतीय परंपरेतील आयुर्वेद आणि इतर वैकल्पिक उपचार पद्धतींमध्ये जनुकीय ज्ञानाचा उपयोग करून, आरोग्य व्यवस्थेत अनेक सुधारणा साधता येऊ शकतात. आयुर्वेद आणि इतर उपचार पद्धती विविध व्यक्तींच्या जीनोमशी संबंधित असलेल्या रोगप्रतिकारक तसेच संवेदनशीलतेचा विचार करू शकतील. भारतातील या उपचार पद्धतींमध्ये वापरल्या जाणार्‍या वनस्पतींमधील औषधी गुणधर्मांचा अभ्यास, जनुकीय माहितीच्या आधारे केला जाऊ शकतो. यामुळे विशिष्ट जीनच्या अभावामुळे किंवा उपस्थितीमुळे, विविध रोगांवर औषधांचा प्रभाव अधिक सुधारता येईल. आयुर्वेदामध्ये विविध उपचार साधनांचा वापर केला जातो. जनुकीय माहितीच्या आधारे कोणत्या साधनांचा प्रभाव कसा आहे, हे समजून घेऊन त्यांचा उपयोग अधिक प्रभावीपणे केला जाऊ शकतो. त्यामुळे उपचारांची कार्यक्षमता अर्थातच वाढेल. आयुर्वेदामध्ये आहार आणि जीवनशैलीवर मोठा जोर देण्यात येतो. जनुकीय माहितीच्या आधारे, व्यक्तीच्या आनुवंशिक गुणधर्मांनुसार उचित आहार आणि आरोग्यवर्धक जीवनशैली निर्धारित केली जाऊ शकते.

भारतीय जनुकीय संशोधन जागतिक स्तरावर आरोग्य, कृषी, आणि जीवशास्त्र क्षेत्रातील स्पर्धेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. जनुकीय संशोधन केंद्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी ठरणार आहे. ‘एआय’ आणि मशीन लर्निंगच्या मदतीने, डेटा विश्लेषण अधिक प्रभावीपणे केले जाऊ शकते. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. विकसित देशांतील संशोधकांबरोबर भागीदारी साधल्यास, ज्ञान व माहितीचा आदानप्रदान होऊ शकतो. भारतीय जनुकीय संशोधन विकसित राष्ट्रांशी स्पर्धा करण्यास सक्षम ठरविणारे एक महत्त्वाचे साधन आहे. यामुळे भारत आपल्या लोकसंख्येच्या विविध आव्हानांसाठी प्रभावी उपाययोजना विकसित करण्यास, आर्थिक विकास साधण्यासाठी तसेच, आरोग्य सुविधांची गुणवत्ता वाढविण्यास सक्षम होणार आहे. विकसित देशांमध्ये आरोग्य, वैद्यकीय संशोधन आणि कृषी क्षेत्रातील नव्या संधींची द्वारे उघडली आहेत. या तंत्रज्ञानाचा भारतीय संशोधकही वापर करू शकतात. एकूणच, जैवतंत्रज्ञान संशोधनाच्या क्षेत्रातील हा मैलाचा दगड असल्याचे म्हणूनच म्हणता येईल.