चंदीगड: पंजाबमधील लुधियाना येथील आम आदमी पक्षाचे नेते गुरप्रीत गोगी बस्सी यांना गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी रात्री एक कार्यक्रम आटपून घरी परतल्यावर, बस्सी आपल्या खोलीत गेले. अचानक खूप मोठा आवाज झाला. बस्सी यांच्या घरातील माणसांनी त्वरीत त्यांच्या खोलीमध्ये धाव घेतली. समोर बस्सी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी जखमी अवस्थेतच रूग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गुरप्रीत बस्सी गोगी यांना त्यांच्याच पिस्तुलातून सुटलेली गोळी लागली आहे. गोगी यांना ही गोळी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गोगी यांच्याकडे सदर पिस्तुलाचा परवाना होता. या संर्दभात रूगणालयातील प्रशासनाला सगळी माहिती पुरवण्यात आलेली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु ते गोगी यांचा जीव वाचवू शकले नाही. आम आदमी पक्षाचे जिल्हा सचिव परमवीर सिंह माध्यमांशी बोलताना म्हणाले की आपचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी आपली दैनंदिन कामं करून आपल्या घरी परतले होते, तेव्हाच ही दुर्घटना घडली. त्यांच्या पश्चात त्यांची बायको, मुलगा व मुलगी आहे.