“हल्लीच्या चित्रपटांमध्ये गीत–संगीतांचा अभाव दिसतो” – जावेद अख्तर

    11-Jan-2025
Total Views |
 
javed akhatr
 
 
 
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाच्या २१ व्या थर्ड आशियाई चित्रपट महोत्सवाचे बिगुल १० जानेवारी २०२५ रोजी वाजले. यावेळी गीतकार दावेद अख्तर यांना एशियन कल्चर या पुरस्काराने गौरवण्यात आले. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते अख्तर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी अलीकडच्या चित्रपटांमध्ये संगीतांचा अभाव दिसतो अशी खंत व्यक्त केली.
 
जावेद अख्तर यांनी पुढे आपले मनोगत मांडताना म्हटले की, “चित्रपटसृष्टीतील लेखकांना योग्य मान मिळण्याची गरज आहे. तसेच प्रादेशिक कलाकृतींना प्रोत्साहन देण्याची देखील नितांत गरज आहे. भारतीय चित्रपटांची परंपरा ही गीत–संगीतांची असून हल्लीच्या चित्रपटांमध्ये मला गीत – संगीतांचा अभाव दिसतो. पण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने ही परंपरा जपली आहे. त्यामुळे जर का आपण चित्रपटांमध्ये गीत–संगीताला महत्व दिले तर हिंदी चित्रपट हा जागतिकदृष्ट्या नक्कीच नावाजला जाईल”.
 
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या संकल्पेनेतून साकारलेल्या थर्ड आशियाई चित्रपट महोत्सवाचे यंदाचे २१वे वर्ष असून या महोत्सवाची सुरुवात ब्लॅक डॉग या चित्रपटाने करण्यात आली. जगभरातील चित्रपट प्रेमींसाठी १६ जानेवारी २०२५ पर्यंत हा महोत्सव रंगणार असून आशियाईत गाजलेले चित्रपट प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे.