संवेदनशून्य

    11-Jan-2025
Total Views |
Electronic Media

समाजात अलीकडील काळात मोबाईल फोन हाती आल्यानंतर जे वाट्टेल तसे अभिव्यक्त होण्याचे ‘फॅड’ आले आहे, ते पाहता यातील बहुतांश प्रमाणात समाजातील संवेदनशून्यताच दुर्देवाने अधिक प्रभावी ठरू पाहत आहे. जसे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आणि युट्यूबवरून नको असलेली व्हिडिओ आणि छायाचित्र प्रसारित केली जातात, तसेच आजकाल रिल्सच्या माध्यमातून तर भयंकर प्रकार उजेडात आणण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून केवळ समाजातील मानसिकता आणि संवेदनशून्यता प्रकर्षाने जाणवत असली, तरी त्यावर बंधने आणण्याची व्यवस्थाच कूचकामी असल्याचे देखील येथे दुर्देवाने नमूद करावे लागत आहे. कारण, भविष्यात याचे विपरित परिणाम समाजात वाईट वर्तनवृद्धीसाठी पोषक ठरू लागले, तर एकीकडे प्रगती आणि दुसरीकडे असा भयंकर छळवाद, हे चित्र पुढील पिढ्यांसाठी नक्कीच घातक ठरू शकते. लोकांनी व्यक्त होणे हा लोकशाहीतील अधिकार असला तरी केव्हा, कोठे आणि कसे अभिव्यक्त व्हायचे, याचेदेखील ताळतंत्र बाळगले पाहिजे. तरच अशा दुर्घटनांना आपोआप आळा बसेल यात संदेह नाही. ‘सायबर क्राईम’ नावाचा राक्षस तर अशाच एका गुन्हेगारी समाजाला खतपाणी घालण्यासाठी, जन्मास आला आहे. त्यावर नियंत्रणासाठी खूप काही करावे लागणार आहे. त्यासाठी या अशा माध्यमांचा सकारात्मक शिक्षणासाठी उपयोग झाल्यास, नक्कीच लाभ होऊ शकतो. आर्थिक फसवणूक ही अलीकडील काळात वाढत चाललेली सामान्यांचीच नव्हे, तर सर्वांसाठीच एक आव्हान बनलेली आहे. जसा या माध्यमांचा गुन्हेगारीसाठी दुरूपयोग होऊ लागला आहे, तसाच या माध्यमांचा वापर चांगल्या कामांसाठीदेखील करता येऊ शकतो, असा विश्वास सामान्यांमध्ये प्रबोधनाच्या आणि जनजागृतीच्या माध्यमातून करता येईल. यासाठी सरकारी साहाय्यावर अवलंबून न राहता, समाजातूनच पावले टाकली गेली पाहिजे. यामुळे आपली उद्याची पिढी अशा गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्याऐवजी, आपल्यातील कौशल्याचा उपयोग करून राष्ट्रासाठी काही चांगले करण्याचा विश्वास बाळगेल यात शंका नाही. तथापि , समाजातील वाढत चाललेली संवेदनशून्यतादेखील यामुळे कमी होईल आणि समाजालादेखील एकमेकांसाठी आपणच काही चांगले करावे, हा संदेश आपोआप मिळेल.

अक्कलशून्य

मुंबई, पुणे, बीड, परभणी आणि राज्यातील आणि देशातील अन्य ठिकाणच्या अत्यंत वाईट अशा काही घटना पाहता, नक्कीच आपला समाज नेमका कोणत्या मुद्द्यांवर एकवटला आहे, यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे समाजसुधारणेकरिता आता समाजातील काही अक्कलशून्य लोकांना वठणीवर आणण्यासाठी, प्रबोधन होणे गरजेचे आहे. काही प्रमाणात अशा गोष्टी घडताना अक्कलशून्यता प्रदर्शित होत आहे, तर काही बाबतीत घटना घडल्यावर या अक्कलशून्यतेचे अतिशय बीभत्स आणि हिडीस रूप दिसून येऊ लागले आहे. आपल्या परिसरात चाललेल्या चांगल्या गोष्टींचे आजकालच्या भाषेत ब्रँडिंग करण्याचा हा काळ असताना, चक्क घडलेल्या आणि घडणार्‍या घटनेवर जे काही लोक समाजाचा घटक म्हणून अकलेचे तारे तोडत असतात, हा रूढ होऊ घातलेला प्रघात अतिशय वाईट आणि चिंता वाढविणारा आहे. यामुळे सभोवतालची परिस्थिती तर आटोक्याबाहेर जातेच, किंबहुना कधी कधी मूळ चांगल्या मुद्द्यावरून लक्ष भरकटविण्यासाठी असे नको ते षड्यंत्रदेखील रचले जात असतात. याला निरपराध लोक बळी पडत असतात. किंबहूना, त्यांना बळीचा बकराच बनविले जाते यात संदेह नाही. हे अनेक आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना सध्या ते भोगत असलेल्या त्रासावरून, लक्षात आले असेलच. मात्र, समाजातील आपल्याच तरूणांना काहीतरी विशिष्ट मुद्दे उपस्थित करून, दिशाभूल करीत ठेवण्यात नेमके काय साध्य करायचे असते? हे या अक्कलशून्य लोकांना सांगणे आता भाग झाले आहे. अन्यथा, अशा भरकटलेल्या आंदोलन आणि चळवळीत पायावर धोंडा पाडून घेतलेल्या आपल्याच समाजातील होतकरू तरुणांचे, उज्ज्वल भविष्य वाया जाईल यात संदेह नाही. राजकारण हे नेहमी विकासाचे असले पाहिजे. तथापि, आजकाल ते केवळ कुरघोडीचे होऊन बसल्याने, यात सहभागी तरुण आंदोलन, चळवळीत नियमभंग आणि गैरकृत्याच्या गुन्ह्यात अडकलेला बघायला मिळतो. यामुळे त्यांच्या भविष्यातील नियोजनावर पाणी फेरले जात आहे. समाजातील अशा अक्कलशून्यांच्या मागे न लागता, तरुणांनी आपल्या कौशल्यावर भर देत स्वतःसोबत राष्ट्र प्रगतीत झोकून दिल्यास, अकलेचे तारे तोडणारे जमिनीवर येतील.

अतुल तांदळीकर